ईर्षा, चुरस आणि लोकशाहीचा उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:29+5:302021-01-16T04:27:29+5:30
इंदुमती गणेश लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गटा-तटातील राजकारण, स्थानिक आघाड्या, काही ठिकाणी वादाचे प्रसंग, संवेदनशील गावात मोठा पोलीस ...

ईर्षा, चुरस आणि लोकशाहीचा उत्सव
इंदुमती गणेश
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गटा-तटातील राजकारण, स्थानिक आघाड्या, काही ठिकाणी वादाचे प्रसंग, संवेदनशील गावात मोठा पोलीस बंदोबस्त, अखेरच्या क्षणापर्यंत मतदार राजाला केंद्रापर्यंत आणण्यासाठीची धडपड, एका-एका मताची जोडणी, ईर्षा आणि चुरस... अशा वातावरणात शुक्रवारी कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने परंतु शांततेत मतदान जाले. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करत ग्रामीण भागातील नागरिकांनी ईर्षेने मतदान केले. जिल्ह्यातील १ हजार ५५३ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीनपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाले होते. हा वेग पाहता सरासरी ८५ टक्क्याहून अधिक मतदानाचा अंदाज निवडणूक यंत्रणेने व्यक्त केला.
सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागात नागरिकांना शेताची कामं असल्याने सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. गावातील शाळेत, मोठ्या इमारतीत प्रभागनिहाय मतदानाची सोय करण्यात आली होती. महिला व पुरुष उमेदवार केंद्राबाहेर उभारून सगळ्यांचे स्वागत करत होते. गावातल्या ताई, माई, आक्का, नाना, मामा सगळ्यांना मतदानासाठी आवाहन केले जात होते. आत मतदान सुरू होते, तर बाहेर उमेदवारांसह समर्थकांची घालमेल सुरू होती. अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी सगळे कार्यरत होते. रात्री उशिरापर्यंत जोडण्या लावल्यानंतर सकाळी प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी ही जोडणी यशस्वी होत आहे का, याचीही चाचपणी केली जात होती. मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या केंद्रांवर भर दुपारीदेखील लांबलचक रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेसात ते साडेअकरा या वेळेत ३६.१२ टक्के इतक्या मोठ्या संख्येने मतदान झाले होते. दुपारची कामं आटोपल्यानंतर, शेतातून घरी आल्यावर अनेकजणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेतही केंद्रांवर तितकीच गर्दी होती.
एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या सुरू असून त्यापैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. विधानसभा-लोकसभेइतकीच किंबहुना अधिक जास्त चुरस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दिसून आली. या निवडणुकीचा परिणाम थेट गावातील नागरिकांच्या सामाजिक जीवनावर होत असल्याने स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक गटांचे राजकारण निर्णायक असते. राज्याच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र कारभार चालवत असले तरी, ग्रामपंचायत निवडणुकीत हेच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसले. काही पक्षांमधील नेते, कार्यकर्ते फुटल्याने त्यांनी स्थानिक आघाडी-पॅनेल तयार करून निवडणूक लढवली. बहुतांश ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संघर्ष होता, काही ठिकाणी त्यांनी एकत्र पॅनेल केले होते. काही गावांमध्ये भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी पक्ष यांचे पॅनेल होते. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेचा एक गट, अशीही काही ठिकाणी रचना होती. अपक्षांनीही निवडणुकीत चुरस आणली.
--
संवेदनशील गावात मोठा बंदोबस्त
पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील १११ गावे संवेदनशील जाहीर केली आहेत. कोगे, हळदीसारख्या संवेदनशील गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने संघर्ष व वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी संवेदनशील प्रभाग अन्य प्रभागांपासून वेगळे करत त्याची परिसरातच स्वतंत्र सोय केली होती. शिवाय केंद्राबाहेर बॅरिकेटिंग करण्यात आले होते व ध्वनिक्षेपकावरून जाहीर सूचना केल्या जात होत्या.
---
सडोली खालसामध्ये मशीन बंद
सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर सडोली खालसा येेथील प्रभाग २ चे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने सुमारे दीड तास मतदान थांबले. मशीन बदलल्यानंतर पूर्ववत मतदान सुरू झाले. मात्र तोपर्यंत मतदारांची मोठी रांग केंद्राबाहेर लागली होती. आजी-माजी आमदारांचे गाव आणि मोठी ग्रामपंचायत असल्याने येथे १३ जागांसाठी तिरंगी लढत झाली.
--
मांडव उभारणी, उमेदवारांकडून स्वागत
मतदारांना मतदानाची स्लीप देण्यासाठी प्रत्येक पॅनेलच्यावतीने मांडव उभारणी, टेबल मांडून सोय करण्यात आली होती. मतदार केंद्राकडे जाताना बाहेर दुतर्फा उमेदवार आणि समर्थकांकडून मतदारांचे स्वागत केले जात होते. अनेक उमेदवार पांढरे कपडे व टोपी घालून, तर महिला पारंपरिक वेशभूषेत उभ्या होत्या. कोणी मतदानाला आले नाही तर त्यांची चौकशी करून त्यांना आणले जात होते.
--
वाहनांची सोय
एक-एक मतदार केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांकडून यंत्रणा लावली जात होती. बहुतांशी गावांमध्ये मतदारांना आणण्यासाठी आणि परत सोडण्यासाठी खास वाहनांची सोेय करण्यात आली होती. वयोवृद्ध, आजारी असलेल्या मतदारांना थेट मतदानाच्या खोलीपर्यंत आणले जात होते. दुपारपर्यंत मतदान न केेलेल्या नागरिकांना बाहेर बोलावून मतदानासाठी नेले जात होते.
---
किंक्रांतीची जेवणावळी
शुक्रवारी किंक्रांत होती. त्यामुळे मतदान झाल्यानंतर गावा-गावात जेवणावळींना ऊत आला होता. नागरिक मतदान करून बाहेर पडले की, त्यांना ठराविक घरांमध्ये जेवणासाठी पाठवून पंगत उठवली जात होती. काही ठिकाणी चहाची सोय होती. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाष्टा, जेवणाची सोय होती.
--
मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मतदान केंद्रांवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कसह सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला हाेता. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मात्र याच्या उलट स्थिती होती. मतदार आत जाताना थर्मल गनने तपासणी केली जात होती आणि काही ठिकाणी सॅनिटायझर देत होते. एवढीच काय ती खबरदारी. कमी लोकसंख्येची मोजकी गावं सोडली, तर कोणत्याही मतदान केंद्रावर नियमांचे पालन केले गेले नाही. महिला तसेच पुरुषांच्या रांगांमध्ये सगळे जवळजवळ उभे होते. मास्क तर नव्हताच.
---
मतदानानंतर पुन्हा शिवारात
ग्रामीण भागातील नागरिक सकाळीच शेतात जातात, ते दुपारनंतर परततात. त्यामुळे सकाळी आधी मतदान केल्यानंतरच अनेक महिला डोक्यावर जेवण, बुट्टी, खुरपं घेऊन शेतात जात होत्या.
--
फोटो फाईल स्वतंत्र