उलगडला तरूणाईच्या कलेचा नजराणा

By Admin | Updated: October 12, 2014 01:11 IST2014-10-12T01:11:43+5:302014-10-12T01:11:57+5:30

शिवाजी विद्यापीठ : राजे रामराव महाविद्यालयाचा परिसर फुलला

Celebrating the art of youthfulness | उलगडला तरूणाईच्या कलेचा नजराणा

उलगडला तरूणाईच्या कलेचा नजराणा

संतोष मिठारी / जत
संगीत, नृत्य, गायन अशा विविध कलांच्या संगमाचा नजराणा आज, शनिवारी तरूणाईच्या बेभान जल्लोषासह धडाकेबाज सादरीकरणातून उलगडला. कलेच्या सप्तरंगांच्या चौफेर उधळणीत शिवाजी विद्यापीठाच्या ३४ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयात प्रारंभ झाला. ठसकेबाज लोकनृत्ये, बहारदार लोकगीते, शास्त्रीयनृत्याचा पदन्यास, वादविवादातील सडेतोड चर्चा, तालवाद्यांच्या जुगलबंदीसह सुगम गायनाने भारावलेले वातावरण ही महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची वैशिष्टे ठरली.
महोत्सवाच्या उदघाटनानंतर महाविद्यालयाच्या प्रागंणातील सात रंगमंचांवर कलाप्रकारांच्या सादरीकरणाला सुरूवात झाली. वेगवेगळ्या लयीत कायद्यांची पेशकश, रेला, चक्रधर आदींच्या माध्यमातून तालवाद्यांत स्पर्धेकांचे कौशल्यपणाला लागले. शब्द आणि बोलीभाषेविना देहबोलीतून लेक वाचवा, तंत्रज्ञानाचा अतिरेक, इंधन बचत, भारनियमन या समस्यांचा वेध मूकनाट्यातून घेतला. ठुमरी, दादरा आणि नाट्यगीतांच्या बहारदार सादरीकरणाने शास्त्रीय गायन मैफील रंगली. कधी विनोदातून, तर कठोरतेने अपंग मुलांच्या समस्या, मतदान, करिअर आदी सामाजिक प्रश्नांवर कोरडे ओढत एकांकिका स्पर्धेने त्यांची जाणीव करून दिली. जुन्या मासिक आणि रंगीबेरंगी कागदांच्या कातरकामातून प्राणी-पक्षी वाचवाचा संदेश आणि निसर्गचित्रे साकारली. रांगोळीच्या सप्तरंगांतून लेकवाचवा, पाणी वाचवाचा संदेश देण्यात आला. पथनाट्यातून अंधश्रध्दा, राजकारण, मतदारजागृती आणि स्त्रीभ्रूण हत्या समस्यांकडे लक्ष वेधले. वादविवादमधील सडेतोड चर्चेतून मतदारराजाचे वास्तव मांडण्यात आले. लघुनाटिकेतून महिलांवरील अत्याचार, शिक्षण, भ्रष्टाचार, लोकशाहीच्या सद्यस्थितीचे दर्शन घडले. दुपारी साडेचार नंतर महोत्सवातील स्पर्धांना गती आली. यात ललित्यपूर्ण, नृत्यातील चपळता आणि तालांशी कसरत आदींचा समावेश असलेल्या शास्त्रीय नृत्याच्या अविष्काराने रसिक मोहित झाले. देशभकतीची स्फूर्ती आणि अस्सल मराठमोळ्या ठसेकबाज लोकगीतांचा सुरेख सांगड घालत समूहगीतांची मैफील रंगली. ढोलकी आणि दिमडीचा ताल, ढोल ताशांच्या कडकडाटावर बेधुंद होऊन नाचणारी तरूणाई अशा जल्लोषी वातावरणात लोकनृत्याने तारूण्याच्या जयघोषाचा कळस गाठला. मुख्य रंगमंचावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा कार्यक्रम सुरू झाला आणि बघता बघता हा परिसर गर्दीने फुलून गेला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या लोकनृत्यांना युवक-युवतींनी भरभरून दाद देत आनंद लुटला. टाळ्या, शिट्या आणि वन्समोअरची फर्माइशींनी स्पर्धेकांना प्रोत्साहीत केले.

Web Title: Celebrating the art of youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.