शंभरी गाठलेल्या तरुणाचा वाढदिवस साजरा
By Admin | Updated: January 17, 2015 00:42 IST2015-01-17T00:40:42+5:302015-01-17T00:42:03+5:30
गोतावळाही सहभागी : मंगळवार पेठेतील मंडळांनी घेतला पुढाकार

शंभरी गाठलेल्या तरुणाचा वाढदिवस साजरा
कोल्हापूर : सध्याच्या जमान्यात शंभरी पूर्ण केलेल्या असंख्य संस्था आपण पाहतो. कारण इतका प्रदीर्घ काळ केवळ चांगले कार्य करणाऱ्या संस्थाच अस्तित्व टिकवू शकतात, परंतु शंभरी ओलांडलेली व्यक्ती अपवादानेच पाहायला मिळते. निरोगी आयुष्य जगलेली व्यक्ती जेव्हा शंभरी पार करते त्यावेळी त्या व्यक्तीचा समाजाला हेवाच वाटतो. असाच हेवा मंगळवार पेठेतील आप्पासाहेब लिंगोजी आळवेकर यांच्याबाबतीत शुक्रवारी पाहायला मिळाला.
आप्पासाहेब आळवेकर यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यांचा आनंद अख्ख्या मंगळवार पेठेतील नागरिकांना झाला. त्यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
सुबराव गवळी तालीम, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, न्यू संभाजी तरुण मंडळ, जय पद्मावती मित्रमंडळ, रॅश ग्रुप, श्रीराम तरुण मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे आळवेकरांचा संपूर्ण गोतावळा सहभागी झाला होता तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, अनिलपंत कोरगांवकर, निवासराव साळोखे, माजी महापौर शिवाजीराव कदम, प्रा. जयंत पाटील यांच्यासारखे मान्यवरही आवर्जून उपस्थित होते.
आळवेकर यांचे मूळ गाव येवती (ता. करवीर) असून, घरची शेती सांभाळून त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. पाटील यांनी तलाठी कोर्सही पूर्ण केला. पुढे त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. महसूल विभागात सिनीअर ग्रामसेवक, सर्कल इन्स्पेक्टर अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या. संपूर्ण सेवेत केवळ चार महिने रजा घेतली.
आप्पासाहेब यांच्या संसाराचा वेल चांगलाच फुलला आहे. तीन मुले, तीन मुली, २० नातवंडे, २६ परतवंडे असा त्याचा परिवार विस्तारला आहे. आप्पासाहेब यांचे वडील लिंगोजी ११५, तर आई सईबाई ११० वर्षे जगल्या. दीर्घायुष्याचा वारसा आता आप्पासाहेबांनाही लाभला आहे. निर्व्यसनी व कष्टाची वृत्ती हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे गमक असल्याचे ते सांगतात.