तनवडीत शेतमजुरांचा कॅशलेस पगार
By Admin | Updated: January 16, 2017 01:01 IST2017-01-16T01:01:16+5:302017-01-16T01:01:16+5:30
पांडुरंग आरबोळेंची सुविधा : पॉश मशीनचा वापर; प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण

तनवडीत शेतमजुरांचा कॅशलेस पगार
संजय थोरात ल्ल नूल
आपण अल्पशिक्षित असलो तरी आपल्या नर्सरीतील कामगार व्यवहार चातुर्य बनला पाहिजे, यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील तनवडी येथील शेतकऱ्याने सर्वच कामगारांचा पगार ‘कॅशलेस’ सुरू केला आहे. पांडुरंग सदाशिव आरबोळे (रा. तनवडी) असे त्यांचे नाव आहे. तंत्रज्ञानाचा वापर स्वत:बरोबरच आपल्या कामगारांनाही करायला लावल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
पांडुरंग यांनी दहावीतून शिक्षण बंद केले. त्यांनी बायोगॅस प्लॉटबांधणीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, ते आर्थिक संकटात आले. पाच वर्षांपूर्वी वडिलोपार्जित शेतीत लक्ष घालून वेगवेगळे प्रयोग सुरु केले. शेती हेच आर्थिक उत्पन्नाचे साधन सापडल्यावर कल्पवृक्ष नावाची नर्सरी सुरू केली. ऊस बियाणे, मिरची, वांगी, टोमॅटो, कोबी, भेंडी यांची रोपे तयार करू लागले. वेगवेगळे तंत्रज्ञान, शेततळी, गांडूळखत निर्मितीच्या माध्यमातून त्यांचा कल्पवृक्ष सध्या फुलला आहे.
नर्सरीत सध्या अठरा कामगार आहेत. ही नर्सरी अठरा कुटुंबांचा आधार बनली आहे. आठवड्याला १५ हजार रुपये कामगारांना पगार द्यावा लागतो. नोटाबंदीनंतर सर्वत्र कॅशलेसचे वारे वाहू लागले. आरबोळेंना ही संकल्पना आवडली म्हणून त्यांनी कॅशलेस व्यवहार सुरू केले. शिवाय कामगारांना सवय लागावी म्हणून त्यांचे पगार ‘पॉश’ मशीनद्वारे कॅशलेस प्रणालीप्रमाणे देण्यास सुरुवात केली. नूलच्या बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये सर्वांची बचत खाती उघडली आहेत. शाखाधिकारी सायमन मस्करेन्हस, बँक प्रतिनिधी प्रवीण आरबोळे यांचे सहकार्य लाभले.
या सुविधेचा प्रारंभ प्रांताधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार राजेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. या अधिकाऱ्यांनीही आरबोळेंच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी माजी उपसभापती विनोद नाईकवाडी, बसवराज आरबोळे, गुरगोंडा पाटील, उपसरपंच व्ही. बी. पाटील, पुंडलिक कदम, बाळासाहेब आरबोळे, माधव सावंत, राजू तेरणीकर, सागर सुतार, शेखर मोर्डी, सुवर्णा आरबोळे, चेतन आरबोळे, कामगार, उपस्थित होते.