काजूबियांची आवक मंदावली; प्रक्रिया उद्योजक धास्तावले
By Admin | Updated: April 13, 2015 00:09 IST2015-04-12T23:43:54+5:302015-04-13T00:09:24+5:30
काजू उद्योगाची समस्या : अवकाळीमुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा घटले

काजूबियांची आवक मंदावली; प्रक्रिया उद्योजक धास्तावले
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरी अद्याप बाजारपेठेत स्थानिक काजूबियांची आवक समाधानकारक न झाल्याने चंदगड-आजरा तालुक्यांतील काजू बी उत्पादक धास्तावले असून, अनेकांना कच्च्या मालाअभावी यावर्षी काजू उद्योग बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.प्रतिवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे स्थानिक काजूबियांची आवक सुरू होते. दरम्यान, कोकणातीलही कच्चा माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असतो. यावर्षी अवकाळी व लांबलेला पाऊस, हवामानातील स्थित्यंतरे यामुळे मुळातच काजूचे उत्पादन पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटले आहे.चंदगड, आजरा तालुक्यांत काजूचे असणारे प्रचंड उत्पादन लक्षात घेऊन या दोन तालुक्यांसह गडहिंग्लज तालुक्यातही सुशिक्षित बेरोजगार युवकांनी लहान-मोठे काजू बी प्रक्रिया उद्योग उभारले आहेत. गेल्यावर्षी काजूगराच्या होलसेल विक्रीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे काजू प्रक्रिया उद्योग कसेबसे सावरले होते. अनेक उद्योजकांनी साठा केलेला कच्चा माल प्रक्रिया न करताच बाहेरील उद्योजकांना विक्री करण्यास प्राधान्य दिले होते.यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. कच्चा मालच बाजारात पुरेसा उपलब्ध नसल्याने बी प्रक्रिया युनिट चालविण्याचा धोका निर्माण झाला आहे. मोठे उद्योजक इंडोनेशिया, आफ्रिका, ब्राझील आदी ठिकाणांहून येणाऱ्या आयात काजूबिया खरेदीस प्राधान्य देताना दिसत आहेत; पण लहान उद्योजकांची मात्र फरफट होताना दिसत आहे. एकंदर काजू बी उत्पादनात झालेली घट प्रक्रिया उद्योजकांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
शेकडो कुटुंबीयांचे संसार अडचणीत
काजूबागांची राखण करणे, काजूबिया गोळा करणे, वाहतूक करणे, खरेदी-विक्री करणे यासह काजूप्रक्रिया उद्योगावर शेकडो कुटुंबीयांचे संसार अवलंबून आहेत. काजू प्रक्रिया उद्योग बंद झाल्यास शेकडो कुटुंबीय अडचणीत येणार आहेत.
उद्योजकांनी घाबरू नये : पोवार
काजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.
उद्योजकांनी घाबरू नये : पोवार
काजूबियांचे उत्पादन कमी झाले म्हणून स्थानिक तरुण उद्योजकांनी घाबरू नये. आयात काजूबिया मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक व आयात मालाची सांगड घालूनच प्रक्रिया उद्योग चालू ठेवावेत, असे आवाहन ज्येष्ठ काजू बी प्रक्रिया उद्योजक महादेव पोवार यांनी केले आहे.