‘कॅश आॅन डिलिव्हरी’चा कोट्यवधींचा माल ‘डिलिव्हरी’च्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: November 11, 2016 00:01 IST2016-11-10T23:59:00+5:302016-11-11T00:01:34+5:30
‘नोटा बंद’चा परिणाम : पैसे नसल्याने वस्तू स्वीकाण्यास नकार; कुरिअर कंपन्यांकडून ग्राहकांना वाढीव मुदत

‘कॅश आॅन डिलिव्हरी’चा कोट्यवधींचा माल ‘डिलिव्हरी’च्या प्रतीक्षेत
अरूण आडिवरेकर -रत्नागिरी --चलनी नोटांमधील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. या निर्णयाचा फटका कुरिअर सेवेला बसला असून, आॅनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ‘कॅश आॅन डिलिव्हरी’शिवाय वस्तू दिली जात नसल्याने सुमारे कोटीचा माल कुरिअर सेवा देणाऱ्या कार्यालयात पडून असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नोटा न स्वीकारण्याच्या निर्णयामुळे कुरिअरबॉईज या वस्तू ग्राहकांना न देता परत येत आहेत. त्यामुळे या वस्तू कार्यालयांमध्येच ठेवण्यात आल्या आहेत. वस्तू नेण्यासाठी ग्राहकांना ४ ते ५ दिवसांची मुदत देण्यात येत आहे.
आॅनलाईन खरेदी करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून, यामध्ये तरूणवर्गाची संख्या अधिक आहे. मोबाईल, कपडे, घड्याळ, बॅग यासारख्या वस्तूंबरोबरच घरगुती वापराच्या वस्तू आॅनलाईन खरेदी करण्याकडे अधिक कल असतो. आॅनलाईन खरेदी करण्यात आलेल्या बहुतांश वस्तूंची डिलिव्हरी रत्नागिरी शहरातील ब्ल्यू डार्ट, दिलेव्हरी डॉट कॉम यांसारख्या कुरिअर सेवांकडे देण्यात आली आहेत. या कुरिअर सेवांकडे दिवसाला सुमारे ५०० ते ७०० वस्तूंचे खोके येतात. सण, उत्सवाच्या काळात हाच आकडा हजाराच्या घरात पोहोचल्याचे दिसून येते. दिवाळीच्या हंगामात कुरिअर सेवांकडे आॅनलाईन खरेदी केलेल्या वस्तूंचा अधिक भरणा होता. त्यामुळे कुरिअरच्या कार्यालयात गर्दी होती. केंद्र शासनाने मंगळवारी चलनातील ५०० आणि १००० रूपयांच्या नोटांवर बंदी आणल्यानंतर या नोटा व्यवहारातून आता बंद झाल्या आहेत. हा निर्णय जाहीर होताच कुरिअर सेवा देणाऱ्या कार्यालयांना या नोटा न स्वीकारण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुरिअर सेवा देणाऱ्या कार्यालयातून ५०० आणि १००० रुपयांची नोट स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे. आॅनलाईन खरेदी करणारे ग्राहक बहुतांशी वस्तू ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ने मागवत असतात. वस्तू घरी आल्यानंतरच त्याचे पैसे दिले जात असल्याने ही वस्तू घरी आल्यानंतर ग्राहक ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा काढून देतात.
या नोटा समोर येताच ‘डिलिव्हरी बॉईज’ या नोटा स्वीकारत नाहीत आणि ती वस्तू पुन्हा कार्यालयात जमा करत आहेत. कुरिअर सेवेला फटका बसत असून, दिवसाला ५० ते ६० वस्तूंपैकी केवळ १० वस्तूच ग्राहकांना दिली जात आहेत. उर्वरित वस्तू कार्यालयात जमा करण्यात येत असल्याने कार्यालयांत वस्तू शिल्लक असल्याचे दिसत आहे. वस्तू नेण्यासाठी ग्राहकांना ४ ते ५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
कुरिअर कंपनीचेच नुकसान
ग्राहकाला वस्तू न देता ती परत येत असल्याने त्यामध्ये कुरिअर कंपनीचाच तोटा आहे. ही वस्तू ग्राहकाला वेळेत देता येत नसल्याने कंपनीला नुकसान सोसावे लागत आहे. कार्यालयात वस्तू जास्त काळ ठेवणे कंपनीला परवडणारे नाही, असेही सांगण्यात आले.
मुदतीनंतर वस्तू कंपनीकडे
पैसे न दिलेल्या ग्राहकांच्या वस्तू कार्यालयात आणल्यानंतर त्यांना ती नेण्यासाठी ४ ते ५ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. या मुदतीत ती वस्तू कार्यालयात येऊन नेणार की घरपोच द्यायची आहे. याची नोंद करण्यात येते. या मुदतीत ही वस्तू ग्राहकाने नेली नाहीतर पुन्हा कंपनीकडे जमा करण्यात येणार आहे.
मोबाईल संख्या अधिक
आॅनलाईन खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये मोबाईलची संख्या अधिक आहे. या मोबाईलची किंमत १० ते १५ हजारांपर्यंत आहे. कुरिअरच्या कार्यालयात मोबाईलचे सुमारे ६० खोके शिल्लक आहेत. त्याशिवाय इतरही वस्तू तशाच ठेवण्यात आल्या आहेत.
ग्राहकच नाहीत
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांनी कुरिअर सेवेकडे पाठ फिरवली आहे. दिवसाला कुरिअर करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या रोडावल्याने दिवसाला केवळ ५० रूपयेच मिळत असल्याचे डीटीडीसी कुरिअर सेवेकडून सांगण्यात आले.