भरतीत अन्याय झाल्यास न्यायालयात
By Admin | Updated: February 15, 2017 01:02 IST2017-02-15T01:02:36+5:302017-02-15T01:02:36+5:30
सकल मराठा समाजाचा इशारा : महानगरपालिकेतील ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदाची भरती
भरतीत अन्याय झाल्यास न्यायालयात
कोल्हापूर : महानगरपालिकेतील ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदाच्या भरतीत मराठा समाजावर अन्याय झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा मंगळवारी सकल मराठा समाजातर्फे आयुक्त पी. शिवशंकर यांना दिला. निवड प्रक्रिया पारदर्शक करावी, भरतीसंदर्भातील निकषांची काटेकोर पूर्तता करावी आणि राज्य सरकारचे मार्गदर्शन मिळेपर्यंत कोणालाही नियुक्ती आदेश दिले जाऊ नयेत, असा आग्रह समाजातील कार्यकर्त्यांनी यावेळी धरला.
महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून ‘वर्ग १’ व ‘वर्ग २’ पदांवरील अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून प्रक्रिया पात्र उमेदवारांना नेमणूक देण्यापर्यंत पोहोचली आहे. त्याचवेळी सकल मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी भरतीत घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आणली आहे. दि. ४ फेब्रुवारीला समाजातील कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांची भेट घेऊन झालेला तांत्रिक घोटाळा निदर्शनास आणून दिला. त्यावेळी त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर आल्यानंतर त्यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली.
प्रा. जयंत पाटील, अॅड. बाबा इंदुलकर यांनी भरती प्रक्रियेला विरोध नाही, मागासवर्गीय उमेदवारास खुल्या गटातून भरती करून घेण्यास विरोध नाही, आरक्षणालाही विरोध नाही, असा खुलासा करतानाच ही प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शक व्हावी, निकषांचे पालन करून करावी, असा आग्रह धरला. या प्रक्रियेत युपीएससी व एमपीएससीने केलेल्या भरतीसंदर्भातील निकषांचे पालन केलेले नाही. संपूर्ण देशभर एकच नियम असताना कोल्हापुरातच फक्त निकष बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
अत्यंत मुद्देसूद, नियमांतील विसंगती आणि सुरू असलेली चुकीची प्रक्रिया याबाबतचे वास्तव युक्तिवाद बाबा इंदूलकर व जयंत पाटील यांनी केला. आम्ही मांडलेले मुद्दे पटत असतील तर प्रक्रिया थांबवा, चुकीचे काही करू नका, अशी विनंती त्यांनी आयुक्तांकडे केली. आयुक्त शिवशंकर यांनी महापालिकेची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, सकल मराठा समाजाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवून घेण्यात आले. सरकारने दिलेल्या निर्देशांप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवित आहोत तसे लेखी पत्र तुम्हाला दिले जाईल. जर शंका असतील तर निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच ज्यांना नियुक्तिपत्रे दिली जातील ती अटींना अधीन राहून दिली जातील. यावेळी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, सभागृह नेता प्रवीण केसरकर, बाबा पार्टे, दिलीप पाटील, बाजीराव चव्हाण, अजित राऊत, जयेश कदम, गणी आजरेकर, आदी उपस्थित होते.
सकल मराठा समाजाच्या मागण्या
खुल्या प्रवर्गातून मागासवर्गीय उमेदवार परीक्षा देणार असेल तर त्याला खुल्या प्रवर्गाचे निकष लावावेत.
त्याच्या वयाची अटही ३८ वर्षे हीच ठेवली गेली पाहिजे.
परीक्षा शुल्कसुद्धा खुल्या प्रवर्गाचेच भरले पाहिजे.
समान गुण मिळाले असतील तर जास्त वय असलेल्याला नेमणूक द्यावी.
निवड प्रक्रिया पारदर्शक करावी