‘आॅफर’ आल्यास राष्ट्रवादीशी आघाडी
By Admin | Updated: April 4, 2015 00:28 IST2015-04-04T00:28:06+5:302015-04-04T00:28:20+5:30
पी. एन. पाटील : जिल्हा बँक निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याचे आवाहन

‘आॅफर’ आल्यास राष्ट्रवादीशी आघाडी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीत काँग्रेसची ताकदीने उतरण्याची तयारी आहे. राष्ट्रवादीकडून आघाडीबाबत जरूर विचार केला जाईल परंतु तोपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी केले आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज, शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे आवाहन केले आहे.
सध्या गोकुळ व जिल्हा बँक या शिखर संस्थांची रणधुमाळी एकाचवेळी सुरू झाली आहे. ‘गोकुळ’च्या अर्ज माघारीच्या दिवशीच जिल्हा बँकेसाठीही अर्ज भरण्याचीही शेवटची मुदत आहे. ‘गोकुळ’मध्ये काँग्रेसची सत्ता आहे व जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचे बहुमत होते. त्यामुळे राष्ट्रवादीने ‘गोकुळ’मध्ये हस्तक्षेप करायचा नाही व काँग्रेसने जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायचा, अशी चर्चा या दोन पक्षांतील नेत्यांत सुरू झाली आहे, परंतु ती अजून चर्चेच्याच टप्प्यावर आहे. तोपर्यंत ‘गोकुळ’मध्ये राष्ट्रवादीस जागा न देण्याचा निर्णय सत्तारुढ गटाचा झाला आहे. त्यामुळे हा पक्ष जिल्हा बँकेत नेमकी काय भूमिका घेतो, याबद्दल साशंकता असल्याने काँग्रेसने लढण्याची तयारी म्हणून कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पी. एन. पाटील म्हणाले,‘जिल्हा बँकेत दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासंबंधी काही प्रस्ताव आल्यास त्याचा जरूर विचार केला जाईल परंतु यासंदर्भातील चर्चा अजूनही वृत्तपत्रांतूनच सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यासंबंधी ‘थेट आॅफर’ आलेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याच्या सूचना केल्या आहेत. अर्ज दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून निवडणुकीत नक्की काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीकडून ‘आॅफर’ आल्यास त्यांच्यासोबत आघाडी करण्याची काँग्रेसची तयारी आहे.’
सत्तेची सद्य:स्थिती..
‘गोकुळ’मध्ये संचालकांच्या अठरा जागा आहेत; परंतु त्यामध्ये राष्ट्रवादीचा एकही संचालक नाही. तिथे एकतर्फी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. जिल्हा बँकेवर २००९ मध्ये प्रशासक नेमला तेव्हा त्यांच्याच ताब्यात बँकेची सत्ता होती. किंबहुना राष्ट्रवादीने गैरकारभार केल्यामुळेच बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याची तक्रार तेव्हा काँग्रेस करत होती. बँकेत काँग्रेसचेही त्यावेळी आठ-नऊ संचालक सत्तेत होते.