शिराज मुजावरांच्या व्यंगचित्रांनी मांडला कोल्हापूरचा लेखाजोखा

By Admin | Updated: November 27, 2014 00:11 IST2014-11-26T23:32:19+5:302014-11-27T00:11:50+5:30

व्यंगचित्रांच्या माध्यमातून केलेले विडंबन सध्या कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत आहे.

Cartography of Shilpa Majha carved out of Kolhapur account | शिराज मुजावरांच्या व्यंगचित्रांनी मांडला कोल्हापूरचा लेखाजोखा

शिराज मुजावरांच्या व्यंगचित्रांनी मांडला कोल्हापूरचा लेखाजोखा

कोल्हापूर : निवडणुकीनंतर नेत्यांच्या डिजिटलची झालेली अवस्था, वाढलेले पाणी बिल, स्वच्छतेचा प्रश्न, खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था, टोल, पंचगंगा-रंकाळा प्रदूषणाचा प्रश्न, अशा विविध समस्यांवर आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून केलेले विडंबन सध्या कोल्हापूरकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत आहे.
व्यंगचित्र हे एकमेव असे माध्यम आहे, ज्यातून तुम्ही समाजातील विसंगतीही मांडू शकता आणि नकळत बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. कोल्हापुरात व्यंगचित्रकारांनी या कलाप्रकारात आपला नावलौकिक केला आहे. त्यातीलच एक व्यंगचित्रकार म्हणजे शिराज मुजावर. कळे विद्यामंदिरमधून निवृत्त झालेले कलाशिक्षक मुजावर यांनी हिंदू युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील समस्यांचे वास्तव व्यंगचित्रांतून मांडण्याचा अनोखा उपक्रम काही दिवस सुरू केला आहे.
शहरातील रंकाळा चौपाटी, पंचगंगा घाट, एस.टी. स्टँड, भवानी मंडप, ताराबाई पार्क, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या गजबजलेल्या ठिकाणी ठाण मांडून शिराज मुजावर व्यंगचित्रे रेखाटतात आणि तेथेच त्यांचे प्रदर्शनही केले जाते. खड्डे चुकवीत पळण्याची शर्यत, स्वच्छता मोहिमेचा श्रेयवाद, खराट्यांची वाढलेली मागणी, खड्ड्यांची अचूक संख्या सांगणाऱ्याला आॅर्थोपेडिक सेवा मोफत, खड्ड्यांचा स्विमिंग पूल, टोलविरोधी आंदोलन, मंगळसूत्र चोरीनंतर देवीला केलेले आवाहन, नेत्यांचे कटआऊटस्.. अशा अनेकविध विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रे मुजावर यांनी रेखाटली आहेत.
मुजावर यांची व्यंगचित्रे विविध दैनिके, साप्ताहिक, दिवाळीअंकांतून प्रसिद्ध झाली आहेत. चंपक तसेच चेन्नईतून प्रसिद्ध होणाऱ्या चिल्ड्रेन्स मॅगेझिनसारख्या कॉमिक्समधूनही त्यांच्या चित्रकथा प्रसिद्ध होतात. त्यांची खट्याळ कुंचला, करामती कुंचला व मिश्कील गुंडुराव अशी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘कोल्हापूरचा लेखाजोखा’ या अभिनव उपक्रमाची सांगता सोमवारी (दि. १) होणार आहे.


व्यंगचित्रकार शिराज मुजावर यांनी भ्रष्टाचारावर भाष्य करणारे रेखाटलेले व्यंगचित्र.

Web Title: Cartography of Shilpa Majha carved out of Kolhapur account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.