कार, मोटारसायकली पेटविल्या
By Admin | Updated: January 1, 2015 00:34 IST2015-01-01T00:33:08+5:302015-01-01T00:34:55+5:30
ताराबाई रोडवरील घटना : रसायने, पेट्रोलचा वापर; अज्ञात हल्लेखोरांचे कृत्य

कार, मोटारसायकली पेटविल्या
कोल्हापूर : येथील ताराबाई रोडवरील जाधव गल्लीमध्ये माजी महापौर बाळासाहेब जाधव-कसबेकर यांच्या घरासमोर पार्किंग केलेल्या आलिशान आॅडी मोटारीसह तीन मोटारसायकली अज्ञात हल्लेखोरांनी काल, मंगळवारी मध्यरात्री रसायने व पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. त्यामध्ये चार गाड्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून, गाड्या पेटविणारे कोण, याचा शोध जुना राजवाडा पोलिसांसह नागरिक घेत आहेत. हा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले, अनिल बाळकृष्ण जाधव (वय ६१, रा. जाधव गल्ली, ताराबाई रोड) हे रात्री अकरा वाजता जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची दारात लावलेली पल्सर मोटारसायकल पेटत असल्याचे शेजारी राहणाऱ्या मिसाळ यांनी पाहिले. त्यांनी जाधव यांना दार ठोठावून याची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी घरातील पाणी मारून आग विझविली.भरत जनार्दन जाधव यांची मोटारसायकल (एमएच ०९ वाय ३५५५), मुकुंद सदाशिव कुलकर्णी (तोफखाने बोळ) यांची मोपेड व नरेंद्र ओसवाल यांच्या आॅडी (एमएच ०४ आर ३२५०) गाडीचे कव्हरही पेटवून दिले होते. अचानक गाड्या पेटवून दिल्याने परिसरात गोंधळ उडाला. नागरिकांनी रस्त्यावर येऊन गाड्या पेटविणाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या जुना राजवाडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हल्लेखोरांनी रसायनाच्या साहाय्याने गाड्या पेटविल्याचे निदर्शनास आले. एका गाडीजवळ पेट्रोलच्या दोन बाटल्या पोलिसांना मिळून आल्या. काही रसायने पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली. मोटारसायकलींच्या पेट्रोलच्या केबल कट केल्याचेही निदर्शनास आले. हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.