जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:54+5:302021-07-05T04:15:54+5:30
कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी ...

जुन्या पिढीचा ‘उद्योग वारसा’ नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेऊन जा
कोल्हापूर : जुन्या पिढीतील उद्योजकांनी जमिनीसाठी करवीर संस्थानाकडे नजराणा भरून कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचला. विविध आव्हानांवर मात करीत त्यांनी उद्योग वाढविला. त्यांनी दिलेला उद्योगाचा वारसा सध्याच्या आणि नव्यापिढीने नवतंत्रज्ञानाच्या साथीने पुढे घेवून जावा. उद्योगाचा विकास करावा, असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक बाबाभाई वसा यांनी रविवारी येथे केले.
येथील शिवाजी उद्यमनगरमधील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन (केईए) बुधवारी (दि.७) अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत असून त्याच्या बोधचिन्हाच्या (लोगो) अनावरणप्रसंगी ते बोलत होते. असोसिएशनच्या सभागृहातील या कार्यक्रमास आमदार चंद्रकांत जाधव प्रमुख उपस्थित होते. मी भाग्यवान आहे, कारण या ‘केईए’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मी अध्यक्ष होतो आणि आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण माझ्या हस्ते झाले आहे. उद्योग उभारणीचा सुरुवातीचा काळ आव्हानात्मक, समस्यांचा होता. मात्र, जिद्दी, कष्टाळू उद्योजकांनी त्यावर मात करत उद्योग सुरू केले. त्यात उद्योजक एस. ए. पाटील, वाय. पी. पोवार, राम मेनन आदींचे योगदान मोलाचे आहे. संस्थान विलीनीकरणात उद्योगांना जागा मिळावी यासाठी उद्योजक एस. ए. पाटील यांनी तर स्वत:कडील दागिने गहाण ठेवून संस्थानाकडे पैसे भरले. त्यानंतर कोल्हापूरच्या उद्योगनगरीची सुरुवात झाली. पुढे कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन या आपल्या मातृसंस्थेची स्थापना झाली. अनेक आव्हानांचा सामना करत या संस्थेसह उद्योग वाढत राहिला. संस्थेच्या इतिहास लक्षात घेऊन संचालकांनी कार्यरत राहावे. नवउद्योजक, उद्योगांना ताकद द्यावी, असे आवाहन बाबाभाई वसा यांनी केले. उद्योग विकासाचे ध्येय घेवून एका विचाराने कार्यरत असणाऱ्या संचालकांमुळे आपली मातृसंस्था केईए ही अमृतमहोत्सवी वर्षात पर्दापण करत आहे. जुन्या पिढीतील उद्योजकांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवल्याने कोल्हापूरचा उद्योग वाढला असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. या कार्यक्रमास असोसिएशनचे उपाध्यक्ष हर्षद दलाल, सहसचिव प्रसन्न तेरदाळकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, रणजित शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासोा कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, जयदीप मांगोरे, अभिषेक सावेकर, सोहन शिरगांवकर, प्रकाश चरणे, श्रीकांत देसाई, प्रदीप व्हरांबळे, मिलिंद सार्दळ उपस्थित होते. असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी प्रास्ताविक केले. सचिव दिनेश बुधले यांनी आभार मानले.
चौकट
तर पहिला ट्रॅक्टर ट्रेलर कोल्हापुरातील असता
सन १९७५-७६ मध्ये कोल्हापुरातील उद्योजक हे म्यानमार येथील कंपनीशी करार करून तेथील तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी जपानलाही गेले. या उद्योजकांना आणखी साथ मिळाली असती तर पहिला टॅक्टर ट्रेलर हा कोल्हापूरमध्ये तयार झाला असता. परंतु ते शक्य झाले नाही, अशी खंत बाबाभाई वसा यांनी व्यक्त केली.