वरणगे पाडळीत बुडालेला ऊस लागला कुजायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST2021-08-01T04:22:31+5:302021-08-01T04:22:31+5:30
वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 ...

वरणगे पाडळीत बुडालेला ऊस लागला कुजायला
वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 एकर ऊस शेतीला या महापुराचा फटका बसला. सलग तिसऱ्या वर्षी महापुरामुळे ऊसशेती खराब झाल्यामुळे या गावांमधील आर्थिक व्यवहाराचा कणा मोडला आहे. घरांमध्ये पाणी आणि शेतामध्ये ऊस पिकाचे नुकसान अशा दुहेरी संकटात या गावांमधील शेतकरी सापडला आहे. त्यापैकी पाडळी गावातील राजर्षी शाहू विकास संस्थेला सलग ऐंशी वर्षापासून 100 टक्के पीक कर्ज वसूल करण्याची परंपरा आहे. शेतकरीही प्रसंगी पोटाला चिमटा लावून प्रामाणिकपणे पीक कर्ज भरत आहेत. त्यामुळे शासनाने केलेल्या कर्जमाफीचा एकदाही या संस्थेच्या एकाही सभासदाला लाभ झाला नाही. वरणगेतसुद्धा 80 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. थकबाकीदार नसल्यामुळे तेही शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांसाठी जाहीर केलेली 50 हजार रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यातच सलग तीन वर्षे आलेल्या महापुरामुळे या गावांमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. घरात शिरलेले पाणी, पडलेली घरे यातून सावरण्याच्या आतच ऊस कुजू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
चौकट : वरणगेतील हनुमान सेवा संस्थेच्या खताच्या गोडाऊनमध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पाण्याची पातळी अनपेक्षित वेगाने वाढल्यामुळे खताची पोती इतरत्र हलविण्यासाठी वेळ मिळाला नाही.
कोट : गेली सलग ऐंशी वर्षे आमच्या संस्थेचे 100 टक्के सभासद प्रामाणिकपणे पीक कर्ज वेळेत भरतात; पण सलग तीन वर्षे झालेल्या ऊस शेतीच्या नुकसानीमुळे पीक कर्ज भरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्ज माफ करावे. अन्यथा सेवा संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत. डी. डी. पाटील, सचिव राजर्षी शाहू सेवा संस्था पाडळी बु.!!