दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची आज घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:26 IST2021-04-20T04:26:37+5:302021-04-20T04:26:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची घोषणा ...

Candidates from both the fronts announced today | दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची आज घोषणा

दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची आज घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघासाठी आज (मंगळवारी) सकाळी अकरा वाजता दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. सोमवारी दिवसभर नेत्यांमध्ये जागांबाबत खलबते सुरू होते. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांची नाराजी दूर करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होता. रूसवे-फुगवे काढताना नेत्यांची दमछाक उडाली. दोन्ही पॅनलमधील बहुतांशी उमेदवार निश्चित आहेत, एक-दोन जागांवर अंतिम क्षणी बदल करण्यासाठी शेवटपर्यंत ताणून धरायचे आणि इच्छुकांसह विरोधी आघाडीला गाफील ठेवण्याची व्यूहरचना दोन्ही पॅनलची आहे.

‘गोकुळ’साठी मंगळवारी माघारीचा अखेरचा दिवस असल्याने सोमवारी पॅनल बांधणीबाबत जोरदार उलथापालथी झाल्या. त्यात निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असल्याने त्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीला स्थगिती मिळेल, अशीच अटकळ सत्तारूढ गटाची होती. त्यामुळे दुपारी बारापर्यंत त्यांच्या सावध हालचाली होत्या. मात्र, स्थगिती न मिळाल्याने पुन्हा हालचाली गतिमान झाल्या. आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात दिवसभरात दोनवेळा बैठका झाल्या. यामध्ये राधानगरी, गडहिंग्लज तालुक्यातील उमेदवारीवरून चर्चा झाली. राधानगरीतून प्रभाकर पाटील, विजयसिंह मोरे यांची नावे तिसऱ्या जागेसाठी पुढे आलीत, मात्र अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यांचे इतर तालुक्यातील उमेदवार निश्चित झाले आहेत.

विरोधी आघाडीचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील आदी नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरूच होते. त्यांच्यात गडहिंग्लज व करवीर तालुक्यातील उमेदवारीवरून पेच आहे. गडहिंग्लजमध्ये सत्तारूढ गटाने दोन जागा दिल्या आहेत. त्यामुळे येथून राष्ट्रवादीतर्फे सतीश पाटील तर काॅंग्रेसकडून सोमगोंड आरबोळे व विद्याधर गुरबे यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची, याबाबत नेत्यांसमोर पेच आहे. आमदार राजेश पाटील हे अभिषेक शिंपी यांच्यासाठी शेवटपर्यंत आग्रही राहिल्याचे समजते.

करवीरमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके यांना जागा दिल्याने ‘शेकाप’ची अडचण झाली आहे. त्यावरही दिवसभर नेत्यांमध्ये खल सुरू होता.

तिसऱ्या आघाडीसाठी अयशस्वी प्रयत्न

उमेदवारी मिळणार नाही, याचा अंदाज आल्यानंतर दोन्ही आघाड्यांकडील इच्छुकांनी रविवारी व सोमवारी तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार काही नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. मात्र, ऐनवेळी तिसरे पॅनल उभे करणे सोपे नसल्याने इच्छुकांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

‘शेकाप’चा उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न

विरोधी आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून ‘शेकाप’ने निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. हसूर (ता. करवीर) येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीबाबत चाचपणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ‘शेकाप’ला जागा देण्याबाबत विरोधी आघाड्याच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू होती.

सुश्मिता पाटील यांच्यावर नावावर चर्चा

सुश्मिता राजेश पाटील यांची उमेदवारी आठ-दहा दिवसांपूर्वीच निश्चित झाली आहे. मात्र, विरोधी आघाडीतील महिला उमेदवार आणि ऐनवेळी नात्यागोत्याचे राजकीय भांडवल होऊ शकते, म्हणून त्यांच्याऐवजी दुसऱ्या नावाची चर्चाही झाली. आमदार राजेश पाटील यांना स्वत: रिंगणात उतरून महिला गडहिंग्लजमधून रेखा सुरेश कुराडे अथवा करवीरमधून रमा बोंद्रे किंवा उमा संभाजी पाटील यांना उमेदवारी देता येईल का? याचीही चाचपणी करण्यात आली.

‘सत्तारूढ’ची ‘अयोध्या’ तर विरोधी ‘अजिंक्यतारा’वर घोषणा

सत्तारूढ गटाच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी सकाळी अकरा वाजता अयोध्या हॉटेल येथे होणार आहे. त्याचवेळी विरोधी आघाडीतील उमेदवारांची नावे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात जाहीर केली जाणार आहेत.

Web Title: Candidates from both the fronts announced today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.