ठरावधारकांच्या मागणीने उमेदवार ‘बेजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:38+5:302021-04-30T04:30:38+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. ...

ठरावधारकांच्या मागणीने उमेदवार ‘बेजार’
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. या ठरावधारकांच्या मागण्यांनी उमेदवार बेजार झाले असून एरव्ही घरात भाजी-भाकरी खाणाऱ्याला रोज चमचमीत जेवण व तत्पूर्वीची सर्व व्यवस्था पुरवावी लागत आहे. काही ठरावधारक घरापासून आठ -दहा दिवस बाहेर असल्याने त्यांच्यासाठी कर्नाटकातून खास ‘पार्सल’ मागवल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात आहे.
‘गोकूळ’च्या निवडणूक चांगलीच रंगात आली असून ठरावधारकांची उचलाउचलीसाठी स्पर्धा लागली आहे. जे सोबत येण्यास तयार नाहीत, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्याचा कोणाशी संपर्क येतो का, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून त्याची घरातच सगळी पूर्तता केली जाते. दोन्ही आघाड्यांकडून इतर कोणाशी संपर्क होणार नाही, अशा अज्ञात ठिकाणी ठरावधारकांना ठेवले आहे. त्यांच्या बडदास्तासाठी खास लोकांची नियुक्ती केली आहे.
सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी, नास्ता दिला जातो. त्यानंतर सकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. कोणाला काय हवे, त्याची लिस्ट तयार केली जाते. जेवण तयार होईपर्यंत तत्पूर्वी लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता केली जाते. मग त्यातही ब्रॅण्डच्या आवडीनिवडी सुरू होतात. एरव्ही ‘गावठी’चा आधार असणाऱ्यांचा चांगलाच भाव वधारला आहे. सकाळच्या जेवल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर दुपारी ४ वाजता चहा दिला जातो. त्यानंतर सायंकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. ६ वाजले की पुन्हा बैठक सुरू होते, ती रात्री १० पर्यंत असते. रात्री जेवताना कधी डोळा लागतो, हेच अनेक जणांना कळत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. रविवारी सकाळी मतदान होईपर्यंत ठरावधारकांना सांभाळावे लागणार असून त्यांच्या आवडी- निवडी पुरवताना उमेदवार बेजार झाले आहेत.
उमेदवारी नको रे बाबा!
‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या निवडणूकीत इतकी टोकाची ईर्षा कधीच पाहावयास मिळाली नव्हती. इतर वेळी पॅनेलमध्ये संधी मिळाली की संचालक झालो, अशी परिस्थिती होती. मात्र यावेळची परिस्थिती काहीसी वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भांडवली गुंतवणुकीत तिपटीने वाढ झाली आहे. त्याची पूर्तता करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी उमेदवारी नको रे बाबा, म्हणण्याची वेळ आली आहे.
दोन्ही प्रकारचे आचारी
ठरावधारकांना आवडेल ते देण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे आचारी तिथे आहेत. सकाळी उठल्यानंतर नाष्ट्यापासून आवड-निवड विचारली जाते. सकाळचे जेवणातील मेनू काय हवेत, प्रत्येकाला हवे ते दिले जाते.
सकाळ, संध्याकाळ वेगळे मेनू
सकाळच्या जेवणातील मेनू हा संध्याकाळी असता कामा नये, असा आग्रह काही ठरावधारकांचा आहे. त्यामुळे मांसाहारी जेवणातील सर्व मेनू जवळपास संपले आहेत.