‘त्या’ संचालकांचे पद रद्द करा
By Admin | Updated: May 23, 2015 00:28 IST2015-05-22T23:35:39+5:302015-05-23T00:28:41+5:30
जिल्हा मध्यवर्ती बँक : राजू शेट्टी यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

‘त्या’ संचालकांचे पद रद्द करा
जयसिंगपूर : ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित झाली होती तेच संचालक जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत पुन्हा निवडून आले आहेत. बॅँकेतील ठेवींची संख्या कमी होत असून, बँक आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे, याची दखल घेऊन ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित ‘त्या’ संचालकांचे पद रद्द करावे, अशी मागणी खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.जिल्हा बॅँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. सहकार विभागाने बॅँकेतील आर्थिक घोटाळ्यांमुळे सहकार अधिनियम ८८ खाली चौकशीनंतर यापूर्वीच्या संचालक मंडळावर वसुलीची जबाबदारी निश्चित करून बॅँकेवर प्रशासक नेमला होता. यापूर्वीच्या संचालक मंडळाने आपल्या निकटवर्तीयांना बेहिशेबी कर्जे देणे, मोक्याच्या जागा आर्थिक वाटाघाटी करून लिलावात काढणे, बॅँकेच्या फर्निचरमध्ये व इतर खरेदी-विक्रीमध्ये ढपला पाडणे, कागल शाखेतील २ कोटी शिलकीचा हिशेब न लागणे, २० गुंठे जमिनीवर ३२ लाख कर्ज देणे, अशा अनेक प्ररणातून जिल्हा बॅँक अडचणीत आली होती.
बॅँकेच्या प्रशासकीय काळामध्ये बॅँकेमध्ये ठेवींचा ओघ वाढला होता. प्रशासकांनी बॅँक पूर्वपदावर आणली होती. परंतु नुकत्याच पंचवार्षिक निवडणुका झाल्या. निवडणूक जाहीर झाल्यावर एप्रिलमध्ये ठेवी २८८९ कोटी होत्या, आजअखेर या ठेवींचा आकडा ३८० कोटीने कमी झाला आहे. याचाच अर्थ ज्या संचालकांवर वसुलीची जबाबदारी निश्चित केली होती त्यांच्यावरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे. (प्रतिनिधी)
...तर बॅँकेला पुन्हा अडचणी येतील
तेच ते संचालक पुन्हा निवडून आल्याने त्यांच्यावरील विश्वास कमी झाला आहे. यामुळे बॅँकही आर्थिक अडचणीत येऊ शकते व आरबीआयच्या धोरणानुसार पुन्हा बॅँकेला अडचणी निर्माण होऊ शकतात. यासाठी जिल्हा बॅँकेमध्ये सहकार विभागाने ज्या संचालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे व ते निवडून आले आहेत, त्या संचालकांना पदावरून कमी करण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष व खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.