अवैध बांधकामांची शास्ती रद्द करा
By Admin | Updated: July 4, 2014 00:52 IST2014-07-04T00:43:11+5:302014-07-04T00:52:42+5:30
राष्ट्रवादीचे आंदोलन : सुनील पवार यांना निवेदन

अवैध बांधकामांची शास्ती रद्द करा
इचलकरंजी : नगरपालिका हद्दीमधील अवैध बांधकामांना लावण्यात येणारी शास्ती रद्द करावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन येथील बांधकाम समितीचे सभापती महेश ठोके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने देण्यात आले.
येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुनील पवार यांची शासन नियुक्त अनधिकृत बांधकाम नियंत्रण समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, इचलकरंजी नगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात लावण्यात येणारी शास्ती रद्द करावी, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी पालिकेच्या हद्दीतील शास्तीची वसुली थांबविण्यात यावी, तसेच शास्ती
रद्द करावी, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळामध्ये नगरसेवक भाऊसाहेब आवळे, नगरसेविका माधुरी चव्हाण, जयप्रकाश जाधव, प्रशांत भोसले, जावेद मुजावर, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)