उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द करा
By Admin | Updated: July 16, 2015 23:57 IST2015-07-16T23:57:22+5:302015-07-16T23:57:22+5:30
इचलकरंजी नगराध्यक्षांची मागणी : दोघा नगरसेवकांचाही समावेश

उपनगराध्यक्षांचे नगरसेवकपद रद्द करा
इचलकरंजी : सभागृहामध्ये माईकची आदळाआपट, मुख्याधिकाऱ्यांना धमकावत गाडीच्या आडवे झोपून त्यांना घेराव घालणे आणि नगराध्यक्षांशी हुज्जत घालून अशोभनीय कृत्य करून गैरवर्तणूक केल्याप्रकरणी नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व सभागृहात मोर्चा घुसविल्याप्रकरणी कॉँग्रेसचे नगरसेवक भीमराव अतिग्रे यांना नगरसेवकपदावरून दूर करावे, अशा आशयाची मागणी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.नगराध्यक्षा बिरंजे यांच्यावर कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच नगराध्यक्षांनी पक्षप्रतोद व उपनगराध्यक्षांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केल्यामुळे नगरपालिकेत राजकीय वादाची तीव्रता वाढली आहे. नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल होत असला, तरी तो मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली ४३ सदस्यांची संख्या पूर्ण होत नसल्याने बिरंजे यांनी सुद्धा ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे सत्तासंघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये ९ जुलै रोजी झालेली सभा उपनगराध्यक्षांना अध्यक्षांच्या खुर्चीवर न बसविणे, शाब्दिक चकमक, नगरसेवकांमध्ये झालेली हमरीतुमरी, प्रचंड गोंधळ अशा कारणांमुळे जोरदार गाजली होती. त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत नगराध्यक्षांनी आपल्या निवेदनात नमूद केला आहे. सभेमध्ये १ ते १५ विषय झाले असताना सभागृहाबाहेर आलेल्या मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी मी व उपनगराध्यक्ष जाधव हे सभागृहाबाहेर जात आहोत, असे सांगून ज्येष्ठ सदस्य अजित जाधव यांना तात्पुरते सभाध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यावेळी उपनगराध्यक्ष सभागृहाबाहेर आले नाहीत. त्यांनी, पक्षप्रतोद सुनील पाटील, रवी रजपुते व अन्य सदस्यांनी रणजित जाधव यांना सभाध्यक्ष करावे म्हणून गोंधळ केला.
मुख्याधिकारी सुनील पवार यांनी सभेचे कामकाज बंद पाडणे ही बाब बेकायदेशीर असल्याची सूचना दिली. त्यानंतर अतिग्रे मोर्चा बाहेर घेऊन गेले; पण सभागृहातील वातावरण कमालीचे तापले होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांकडे मागणी
‘त्या’ सभेदिवशी पक्षप्रतोद सुनील पाटील, उपनगराध्यक्ष रणजित जाधव व भीमराव अतिग्रे यांनी नगराध्यक्षांशी हुज्जत घालून अशोभनीय कृत्य करून गैरवर्तणूक केली आहे. म्हणून महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ कलम ४२ (१) व (२) आणि ५५ अ प्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नगराध्यक्षा बिरंजे यांनी केली आहे.