अंशदायी पेन्शन योजना रद्द करा
By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:47:42+5:302016-04-02T00:02:21+5:30
शिक्षकांची मागणी : संघाच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन

अंशदायी पेन्शन योजना रद्द करा
सोळांकूर : शिक्षकांसाठी अंशदायी पेन्शन योजना अन्यायकारक आहे. ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्रा. एस. डी. पाटील आणि खासदार ए. टी. पाटील यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची भेट घेतली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मंत्री सिन्हा यांनी दिले.
दिल्ली येथील मंत्री सिन्हा यांच्या कार्यालयात प्रा. एस. डी. पाटील आणि खासदार पाटील यांनी सिन्हा यांना २० पटाखालील शाळा बंद करणे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेणे असल्याचे पटवून दिले. दरम्यान, सिन्हा यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यामुळे २० पटाखालील शाळा बंद होणार नाहीत, याबाबतची माहिती संबंधित विभागाकडून घेऊन योग्य निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात राज्याचे नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, आप्पासाहेब कुल, एम. वाय. पाटील, अंबादास वाझे, आदी पदाधिकारी सहभागी होते.