प्रचाराने निघाला जिल्हा ढवळून...!
By Admin | Updated: April 10, 2015 23:48 IST2015-04-10T21:32:09+5:302015-04-10T23:48:50+5:30
निवडणुकीचीच चर्चा : गोकुळ, जिल्हा बँक, राजाराम साखर कारखाना, ‘कोजिमाशि’ची रणधुमाळी

प्रचाराने निघाला जिल्हा ढवळून...!
रमेश पाटील -कसबा बावडा -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ), कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (केडीसीसी), तसेच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना आणि कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्था अशा संस्थांच्या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्हा निवडणूकमय झाला असून, सततच्या प्रचारामुळे ढवळून निघाला आहे.
गावागावांत प्रचारासाठी धुरळा उडवत फिरणाऱ्या गाड्या, गल्ली, चौकातून प्रचारासाठी होणारी गर्दी, नमस्कार करीत सतत जोडले जाणारे हात, खादीच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यात वावरणारे कार्यकर्ते, लग्न, बारसे, जावळ, आदी कार्यक्रमांबरोबरच अगदी स्मशानभूमीतही तितक्याच चवीने निवडणुकीची होणारी चर्चा या सर्वांमुळे संपूर्ण जिल्हा निवडणूकमय झाल्याचे दिसून येत आहे.
माजी मंत्री हसन मुश्रीफ, विनय कोरे, सतेज पाटील, आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, खासदार राजू शेट्टी, प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, माजी खासदार निवेदिता माने, संजय घाटगे, आदी नेत्यांसह अनेक आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या निवडणुकीत उतरल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या नेत्यांकडे लागले आहे. त्यामुळे नेत्यांचे प्रचारदौरे, बैठका, मेळावा यांना महत्त्व आले आहे. नेतेही प्रचारादरम्यान नेमके काय बोलायचे आणि काय टाळायचे, हे परिस्थितीनुसार ठरवू लागले आहेत. नेत्यांच्या प्रचार सभेपूर्वी त्या-त्या गावांत जोरात निवडणुकीची चर्चा होते. त्यामुळे वातावरण आपोआपच निवडणूकमय होण्यास मदत होते.
जिल्हा पातळीवर एखाद्या नेत्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा खाली गावपातळीवरील राजकारणावर परिणाम होत असतो. त्यामुळे आपला नेता नेमकी काय भूमिका घेतो, याची उत्सुकता गावपातळीवरील नेत्यांना लागून असते. त्यामुळे सर्वत्र निवडणुकीचीच चर्चा झडत आहे.
‘राजाराम’चे करवीर, राधानगरी, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, कागल अशा सात तालुक्यांत १२२ गावांत जरी कार्यक्षेत्र असले तरी आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्यात सामना रंगणार असल्याने या निवडणुकीत नेमके काय होणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे निवडणुकीचीच चर्चा जास्त होते.
महाडिक-सतेज पाटील आमने-सामने
‘गोकुळ’मध्येही आमदार महाडिक व सतेज पाटील यांच्यात सामना होणार आहे. ‘गोकुळ’चे कार्यक्षेत्र तर संपूर्ण जिल्हा आहे. गावागावांत असलेल्या दूध संस्था ‘गोकुळ’च्या सभासद आहेत. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते.
जिल्हा बँक तर गावच्या विकास सोसायटीचा फायनान्सर असते. त्यामुळे जिल्हा बँकेचे राजकारण समजून घेण्यात, पाहण्यात लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे सध्या कोल्हापूर जिल्हा निवडणूकमय झाला आहे. प्रचाराने जिल्हा ढवळून निघाला आहे, हे मात्र निश्चित...!