‘वडाप’विरोधात धडक मोहीम
By Admin | Updated: July 22, 2014 00:42 IST2014-07-22T00:18:57+5:302014-07-22T00:42:53+5:30
महापालिकेची कारवाई : रिक्षाचालकाचा पथकावर गाडी घालण्याच्या प्रकाराने तणाव

‘वडाप’विरोधात धडक मोहीम
कोल्हापूर : महापालिका परिवहन मंडळाच्या (के.एम.टी.) कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार, दररोजचा वाढणारा तोटा, अवैध वाहतूक, आंधळे प्रशासन यामुळे दररोज के.एम.टी.च्या बसेसचा प्रवास तोट्याकडेच सुरू आहे. आज, सोमवारी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी अवैध वाहतुकीवर (वडाप) शहर पोलिसांच्या साहाय्याने थेट कारवाई केली.
यावेळी रिक्षाचालकांची पथकाबरोबर वादावादी झाली. एका ठिकाणी रिक्षाचालकाने पथकातील कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला. अशीच कारवाई उद्या, मंगळवारी सुरू राहणार असल्याने रिक्षाचालक व के.एम.टी. प्रशासन यांच्यात संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. दिवसभरातील कारवाईच्या दणक्याने के.एम.टी.च्या उत्पन्नात तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार गेले दोन महिने थकले आहेत. नव्या बसेस येईपर्यंत महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करीत के.एम.टी. प्रशासनाने महापालिकेकडे पगारासाठी हात पसरले. ४२ लाखांची मदत देण्यापूर्वी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी के.एम.टी. प्रशासनाच्या आंधळ्या कारभारावर ताशेरे ओढत प्रभारी व्यवस्थापक संजय भोसले यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
गेल्या वर्षभरात उत्पन्नवाढीसाठी बैठका व पोलिसांना अवैध वाहतूक रोखण्यासाठी केलेला पत्रव्यवहार वगळता व्यवस्थापनाला काहीही करता आलेले नाही. दुसरीकडे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ८५० कुटुंबांची आर्थिक कुचंबणा होत आहे. कामगारांची आर्थिक अवस्था बिकट असताना महापालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल कर्मचाऱ्यांतून विचारला जात होता.
त्यामुळेच स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी आजपासून ‘वडाप’वर थेट कारवाई सुरू केली. संपूर्ण शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी भरारी पथकांप्रमाणे चव्हाण यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे रिक्षाचालक संतापले. त्यांनी पथकाच्या कारवाईला विरोध केल्याने गोंधळ उडाला. अखेर ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला. या कारवाईत उपायुक्त अश्विनी वाघमळे, नगरसेवक रमेश पोवार, आदी सहभागीझाले होते.