बँकेतून रक्कम काढताना मोजून घ्या !
By Admin | Updated: December 2, 2014 00:20 IST2014-12-01T23:08:22+5:302014-12-02T00:20:55+5:30
पैसे न मोजल्याने शिक्षिकेला आठ हजारांचा फटका

बँकेतून रक्कम काढताना मोजून घ्या !
राधानगरी : बॅँकेतून मोठी रक्कम काढताय... गडबडीत पैसे न मोजता रोखपालावर विश्वास ठेवून पैसे घेताय... पण, कदाचित तुम्हालाही फटका बसू शकतो. काल जिल्हा बॅँकेच्या राधानगरी शाखेतून पैसे काढताना असाच निष्काळजीपणा दाखविल्यामुळे एका शिक्षिकेला एक-दोन नव्हे, तर तब्बल आठ हजार रुपयांचा फटका बसला आहे.
फेजिवडे येथील माध्यमिक शिक्षिक ा रोहिणी राजाराम निऊं गरे (रा. सोन्याची शिरोली) यांनी घरबांधकामासाठी माध्यमिक शिक्षक पतसंस्थेतून कर्ज घेतले. संस्थेने त्यांना कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या येथील शाखेचा दीड लाखाचा धनादेश दिला. त्यांचे पती राजाराम निऊंगरे यांनी हा धनादेश बॅँकेत वटविला. रोखपालने त्यांना पाचशेच्या नोटांचे पन्नास हजार व शंभराच्या नोटांचे एक लाख रुपये दिले. पाचशेच्या नोटा मशीनद्वारे मोजून दिल्या. मात्र, शंभराच्या नोटांचे प्रत्येकी शंभरप्रमाणे असणारे दहा बंडल सुतळीने एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा दिला. मोजण्याबाबत विचारता ही रक्कम मुख्य कार्यालयाकडून आल्याने त्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.
निऊंगरे यांनी सुट्या नोटा अगोदर वापरल्या व नंतर वाळू विक्रेत्याला शंभरचे बंडल दिले. मात्र, त्यामध्ये २१ नोटा कमी आढळल्या. तत्काळ त्यांनी घरी येऊन अन्य बंडलातील नोटा मोजल्या. त्यापैकी अन्य एका बॅँकेच्या शिक्क्यांचे लेबल असलेल्या सात बंडलात नोटा बरोबर आढळल्या, पण जिल्हा बॅँकेचे लेबल असणाऱ्या व फक्त रबर असणाऱ्या अन्य दोन बंडलांपैकी एकात ४१ व एकात १७ नोटा कमी आढळल्या. शिवाय यापैकी एक नोट बनावट असल्याचेही आढळले. अशाप्रकारे त्यांना तब्बल आठ हजार रुपये कमी मिळाले.
हे निदर्शनाला येताच त्यांनी बॅँकेत धाव घेऊन रोखपालकडे गाऱ्हाणे मांडले; पण त्यांनी ही रक्कम जशी मुख्य कार्यालयाकडून आणली तशी ती न सोडता तुम्हाला दिली आहे. शिवाय तुम्ही बॅँकेच्या काउंटरपासून बाहेर गेल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. यामुळे असा प्रकार इतरांच्या बाबतीत घडू नये, यासाठी कितीही घाई असली तरी नोटा मोजून घेणे अपरिहार्य असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)