हृदयाला बळकटी देणारा निवडुंग मृत्यूपंथाला
By Admin | Updated: September 26, 2014 23:33 IST2014-09-26T22:08:57+5:302014-09-26T23:33:38+5:30
जीवनदायीकडे डोळेझाक : संवर्धनाकडे सर्वांचेच होतेय कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष

हृदयाला बळकटी देणारा निवडुंग मृत्यूपंथाला
श्रीकांत चाळके - खेड -विज्ञानाने सर्वदूर शोध लावल्यानंतर काही वनस्पती आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. कडुनिंबासारख्या वनस्पती अनेक शारीरिक कमजोरीवर गुणकारी आहेत. मात्र, हृदय कमजोर झाल्यास त्याला बळकटी आणून धडधड बंद करणारा आणि आयुर्वेदाने ‘जीवनदायी’ संबोधलेला निवडुंग दुर्मीळ झाला आहे़ निवडुंगचे संवर्धन करण्यात शासन पातळीवर उदासीनता दिसून येत असल्याने बहुगुणी असलेला हा निवडुंग मृत्युपंथाला लागला आहे.
सिमेंटच्या वाढलेल्या जंगलात रासायनिक फवारे मारलेले आणि पावडर टाकून अकाली कृत्रिम पक्व केलेली फळे खाण्याची वेळ आली आहे़ अशा काळात आयुर्वेदाने वाखाणलेली नागाची फणी आकाराचे अथवा पंचकोनी निवडुंग डोंगरदऱ्यातून भुईसपाट होत चालले आहे. हृदयाची दुर्बलता निवडुंगाच्या रसाने दूर होते, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोकणातील डोंगर दऱ्यामध्ये निवडुंग नजरेला पडत असत. येथील निवडुंगांना फळे येत नव्हती. या निवडुंगाचा कुंपणासाठी चांगला वापर होत असे. कोकणात बांधावर कुंपणातील दिसणारा निवडुंग तसेच दोन दशके कोकणात फळविरहीत आढळणारा निवडुंग आज दुर्मीळ झाला आहे.
मराठवाडा विभागात डोंगर दऱ्यातून पूर्वी मुबलक प्रमाणात या फळरहीत निवडुंगाचे दर्शन होत होते़ याच निवडुंगाच्या फळांचा उपयोग शरीरातील धोकादायक आजारांवर होत आहे. अशा बहुगुणी आणि दीर्घकालीन उपयोगी असलेले हे निवडुंग नष्ट होऊ लागले आहे. बंंजारा समाज व आदिवासी लोक निवडुंगाची बोंडं आवडीने खातात, असे येथील भरणे व खेड परिसरातील आयुर्वेदाचार्य सांगतात.
निवडुंग उष्ण कटिबंंध आणि ओसाड जंगलदऱ्यातून आढळते. डोंगरदऱ्यांतील शेतीला कुंपण म्हणूनही याचा वापर होतो़ पूर्वी आदिवासी लोक द्रोण, पत्रावळी तसेच विडी तयार करण्यासाठी पळसाची पाने तोडण्यासाठी जात असत तेव्हा निवडुंगाची पिकलेली फळे खावून ते या रानमेव्याचा आस्वाद घेत.
निवडुंगाच्या रस सेवनाने भूक वाढते. कफ विकारावरही गुणकारी आहे. सतत होणारा मूत्र विकार तसेच दाह, हृदयविकारावर या फळाचां रस गुणकारी आहे, असे बहुउपयोगी असलेले निवडुंग आता दुर्मीळ होऊ लागल्याने काही पर्यावरणवाद्यांनीही चिंता व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)
असा आहे निवडुंग...
निवडुंगात ४१ टक्के शर्करा, साडेसहा टक्के मांसजन्य घटक, ३० टक्के साखर असते व उर्वरित भाग चोथा असतो़ शिशिर ऋतूत झाडांना फळे येतात. फळापासून सरबत केले जाते तर काही ठिकाणी फळे भाजून खाल्ली जातात. कफ व दम्यासाठी हे गुणकारी आहे. आयुर्वेदाने जीवनदायी म्हणून उल्लेख केलेले हे निवडुंग आता मृत्युपंथाला लागले आहे़