शिरोळमध्ये आधार जोडण्यासाठी तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:44+5:302021-01-23T04:24:44+5:30
शिरोळ : आधार जोडा, अन्यथा मिळणार नाही रेशन... शासनाच्या या आदेशामुळे रेशन धान्य दुकानात आधारकार्ड जमा करण्यासाठी शिधापत्रिका धारकांची ...

शिरोळमध्ये आधार जोडण्यासाठी तारांबळ
शिरोळ : आधार जोडा, अन्यथा मिळणार नाही रेशन... शासनाच्या या आदेशामुळे रेशन धान्य दुकानात आधारकार्ड जमा करण्यासाठी शिधापत्रिका धारकांची तारांबळ उडाली आहे. शिधापत्रिकेतील सदस्यांच्या आधारकार्डची पडताळणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले असून यासाठी ३१ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
शिरोळ तालुक्यात १३८ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. अन्न सुरक्षा योजनेत शासनाने पोर्टेबिलिटी योजना चालू केली आहे. कोणताही लाभार्थी कुठेही आपले धान्य उचलू शकतो. मात्र, यासाठी शिधापत्रिका धारकाचे आधार संलग्निकरण करणे आवश्यक आहे. रेशनिंग व्यवस्था अधिक पारदर्शी करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यापूर्वी अनेकवेळा शिधापत्रिका धारकांच्या सर्व कुटुंबांचे आधारकार्ड, जुनी शिधापत्रिका, बँकेचे पासबुक तसेच स्वत:चे छायाचित्र घेऊन अर्ज देखील भरून घेण्यात आले होते. दरम्यान, सध्या आधार पडताळणीसाठी शिधापत्रिकेवरील सर्वांचेच आधारकार्ड पडताळणी सुरू झाली आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू आहे. शासनाच्या योजनेस पात्र राहण्यासाठी ३१ जानेवारीअखेर आधार संलग्निकरण करून घ्यावे, असे आवाहन पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.