मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी
By Admin | Updated: July 9, 2016 00:43 IST2016-07-09T00:28:52+5:302016-07-09T00:43:09+5:30
मागील १० वर्षांपासून भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा हुलकावणी
यावेळीही भोपळा : पालकमंत्री भंडारा जिल्ह्याचाच असावा
भंडारा : मागील १० वर्षांपासून भंडारा जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शुक्रवारला झालेल्या राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला पुन्हा हुलकावणी मिळाला आहे.
भंडारा-गोंदिया संयुक्त जिल्हा असताना गोंदिया जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपद मिळाले. त्यावेळी केवलचंद जैन, छेदीलाल गुप्ता, प्रा.महादेवराव शिवणकर यांना मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या सरकारमध्ये राजकुमार बडोले यांना संधी मिळाली. सन १९९४-९५ मध्ये शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा विलासराव श्रुंगारपवार यांच्या रूपाने भंडारा जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण खात्याचे ते राज्यमंत्री होते. त्यावेळी ते जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर १० वर्षे मंत्रिपदाची कुणालाही संधी मिळाली नाही. सन २००३-०४ मध्ये सुशिलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बंडूभाऊ सावरबांधे यांना संधी मिळाली होती. ते अन्न व औषध खात्याचे राज्यमंत्री होते. त्यानंतर सन २००८-०९ मध्ये अशोक चव्हान यांच्या मंत्रिमंडळात नानाभाऊ पंचबुद्धे यांना संधी मिळाली होती. ते शालेय शिक्षण खात्याचे खात्याचे राज्यमंत्री होते. जिल्ह्याला लाभलेल्या राज्यमंत्र्यांना वर्षभरापेक्षा अधिक कार्यकाळ मिळाला नाही हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)
भाजपचेच आमदार तरीही निराशा
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा व साकोली असे तीन विधानसभा क्षेत्र आहेत. यात तुमसरचे चरण वाघमारे, भंडाऱ्याचे रामचंद्र अवसरे, साकोलीचे बाळा काशीवार हे तिन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. आमदार चरण वाघमारे आणि आमदार बाळा काशीवार यांना सभागृहाचा चांगला अनुभव आहे. तरीही त्यांना सामावून घेण्यात आले नाही. पहिल्यांदा आमदार झालेल्यांनाही आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले आहे.