कुठलीही भाजी घ्या ३० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:53+5:302020-12-14T04:35:53+5:30
थंडी सुरू झाली की भाजीपाल्याची आवक वाढतेच. त्यामुळे या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारात रेलचेल असते. रविवारी लक्ष्मीपुरीतील ...

कुठलीही भाजी घ्या ३० रुपये किलो
थंडी सुरू झाली की भाजीपाल्याची आवक वाढतेच. त्यामुळे या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या भाज्यांची बाजारात रेलचेल असते. रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडाबाजार तर फळांनी आणि भाज्यांनी हाऊसफुल्ल झाला होता. कोबी व फ्लॉवरचे ढीग लागले होते. एका गड्ड्याचा दर दहा रुपये होता. मेथी, पालक, शेपू, पोकळा या भाज्या व कोथिंबीर दहा रुपयांना दोन पेंढ्या अशी विकली जात होती.
मटार, गाजरची बाजारात आवक वाढली असून, दरही ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. लिंबूने बाजार पिवळाधमक दिसत आहे. दहा रुपयांना दहा नग असा दर आहे. कडीपत्ता मात्र काहीसा महाग झाला आहे. फळभाज्यांमध्ये गवारी ८० रुपये किलो सोडली तरी उर्वरित सर्व भाज्या ३० ते ४० रुपये किलाे झाल्या आहेत.
फळबाजारात संत्र्यांची तुफानी आवक कायम आहे. ५० रुपयांना दोन किलो असा दर आहे. माल्टा, मोसंबीदेखील ३० ते ४० रुपये किलो आहेत. अंजीरची आवक सुरू झाली आहे. दर मात्र १५० रुपये किलो आहेत. ॲपल बोर, पेरू व केळीचे दर गडगडले आहेत. डाळींब ४० रुपये किलो आहेत.
मूग १२० रुपये किलोवर
डाळीचे दर स्थिर झालेले असताना हिरव्या मुगाचे मात्र दर पुन्हा वाढत चालले आहेत. १२० रुपये किलो असा किरकोळचा दर झाला आहे. मटकीचे दर ८५ रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. इतर सर्व डाळींचे दर स्थिर आहेत.
तिखटासाठीच्या लाल मिरचीची आवक सुरू झाली आहे. देशी मिरची २५० रुपये, गुंटूर व लवंगी २५० रुपये किलोचा दर आहे. ब्याडगी ३०० ते ३५० रुपये दर आहे.
फोटो: १३१२२०२०-कोल-बाजार मिरची
फोटो ओळ : बाजारात हिरव्या मिरचीची आवक प्रचंड झाली आहे.
फोटो: फोटो: १३१२२०२०-कोल-बाजार अंजीर
फोटो ओळ: लक्ष्मीपुरी बाजारात रविवारी अंजिराची आवक सुरू झाली आहे.
फोटो: १३१२२०२०-कोल-बाजार फ्लॉवर
फोटो ओळ: बाजारात आवक वाढल्याने फ्लॉवरचे असे ढीग दिसत आहेत.