उद्योजक, व्यापाऱ्यांनी आता प्रश्नांसाठी तपश्चर्या करावी का?

By Admin | Updated: August 20, 2015 22:55 IST2015-08-20T22:55:59+5:302015-08-20T22:55:59+5:30

शंतनू भडकमकर : सांगलीत व्यापारी, उद्योजकांचा मेळावा

Businessmen, businessmen should now make penance for questions? | उद्योजक, व्यापाऱ्यांनी आता प्रश्नांसाठी तपश्चर्या करावी का?

उद्योजक, व्यापाऱ्यांनी आता प्रश्नांसाठी तपश्चर्या करावी का?

सांगली : वर्षानुवर्षे संघर्ष करूनही व्यापारी, उद्योजकांचे प्रश्न सुटत नाहीत. पूर्वीच्या साधूंसारखी व्यापारी, उद्योजकांनी आता तपश्चर्या करावी का, असा सवाल महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी गुरुवारी सांगलीत उपस्थित केला. चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने राजमती भवनात आयोजित व्यापारी व उद्योजकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
भडकमकर म्हणाले की, व्यापारी व उद्योजकांना अनेक प्रकारचे प्रश्न भेडसावत आहेत. किचकट प्रक्रियेत अडकल्यामुळे उद्योग व व्यापार वाढीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. आजवर संघर्ष करीत असलेल्या उद्योजक व व्यापाऱ्यांना आणखी किती काळ संघर्ष करावा लागणार? किती वर्षे तपश्चर्या केल्यावर शासन प्रसन्न होणार, याचे उत्तर कोणाकडेही नाही. नव्या करप्रणालीबाबतही अजून प्रश्न आहेत. जुन्या करांचे प्रश्न अजूनही तसेच आहेत. अमेरिकेतील करप्रणालीचा जसा अनुभव आम्हाला आला, तसा भारतात का येत नाही? वास्तविक चांगल्या गोष्टी भारतामध्ये सुरू झाल्या पाहिजेत. त्यामुळे आम्ही शासनस्तरावर या सर्व गोष्टींसाठी पाठपुरावा करीत आहोत. आशावाद अजूनही सोडलेला नाही.
चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाले किंवा नैसर्गिक आपत्ती आली, तर कर्जमाफी दिली जाते. पण व्यापारी, उद्योजकांना अशी कोणतीही माफी दिली जात नाही. आम्हाला माफी देण्यापेक्षा, आयकर भरूनही जर उद्योग, व्यापार अडचणीत आला, तर दहा वर्षात भरलेल्या आयकराची रक्कम पुढील तीन वर्षाकरिता बिनव्याजी वापरण्यास मिळावी, अशी आमची मागणी आहे. सध्याचा जीएसटी (गुड्स अ‍ॅण्ड सर्व्हिस टॅक्स) वेगळ्या पद्धतीचा आहे. एकच करप्रणाली म्हणत असले तरी, केंद्र, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा तीन स्तरावर हा जीएसटी लागू करण्याचा विचार सुरू आहे.
वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी म्हणाले की, टोलचा प्रश्न अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही. टोल नाक्यांवर होणारी अडवणूक, त्यातून होणारा वेळ व पैशाचा अपव्यय या गोष्टी वाहतूक व्यवसायाला हानिकारक आहेत. प्रत्येक राज्यात ठिकठिकाणी आता चेकपोस्ट येणार आहेत. त्यामुळे पुन्हा नाक्यावरील अडवणुकीचा प्रकार होऊ शकतो. वाहतूकदारांसाठी प्रत्येक महामार्गावर ट्रक चालकांसाठी विश्रांती कक्ष असावा, अशी आमची मागणी आहे.
बाजार समितीच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुजीर जांभळीकर, शीतल पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात माजी महापौर सुरेश पाटील यांनी व्यापारी, उद्योजकांचे विविध प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा चेंबर आॅफ कॉमर्सच्यावतीने करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूसाहेब पाटील, युवा उद्योजक विभागाच्या राज्य अध्यक्षा नेहा खरे, समीर दुधगावकर, बापूसाहेब पुजारी, ललित गांधी, विलास शिरोरे, सनतकुमार आरवाडे, आदी उपस्थित होते. स्वागत महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे विश्वस्त अरुण दांडेकर यांनी केले. (प्रतिनिधी)

डिझेल, पेट्रोलचा एलबीटी...एलबीटी रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी, डिझेल आणि पेट्रोलचे दर अजून कसे कमी झाले नाहीत, असा सवाल बाळासाहेब कलशेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला. तोच धागा पकडून चेंबरचे उपाध्यक्ष मंडलेचा म्हणाले की, हाच प्रश्न घेऊन आम्ही पेट्रोलियम कंपन्यांना याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत कंपन्यांनी येत्या पाच ते सहा दिवसात इंधनाचे दर कमी होतील, असे सांगितले आहे. त्यामुळे एलबीटी रद्दचा प्रत्यक्ष परिणाम आपणास लवकरच पाहायला मिळेल.


सांगली जिल्ह्याच्या मागण्या
सुरेश पाटील यांनी चेंबरच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिलेल्या निवेदनात अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

सांगलीत निर्यात केंद्राची निर्मिती करावी
बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना सभापती, उपसभापती पद मिळण्याची तरतूद करावी
मणेराजुरी-अलकूड-सिद्धेवाडी एमआयडीसी करावी
पुणे-हडपसर-जेजुरी-विटा-तासगाव-मिरज-चिकोडी-संकेश्वर हा पर्यायी महामार्ग हवा
जिल्ह्यातील दुष्काळी भागांसाठी शिरपूर पॅटर्न राबविण्यात यावा
द्राक्ष व्यापाऱ्यांना कमी दरात कर्ज उपलब्ध व्हावे

Web Title: Businessmen, businessmen should now make penance for questions?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.