बसची चाचणी पुढील आठवड्यात
By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-18T23:52:26+5:302014-12-19T00:12:11+5:30
बेळगावातच पाहणी : केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर मिळणार २५ बस

बसची चाचणी पुढील आठवड्यात
कोल्हापूर : केंद्र शासनाच्या ४४ कोटी रुपयांच्या निधीतून केएमटी खरेदी करणाऱ्या १०४ नव्या बसेसपैकी प्रोटोटाईप मॉडेल बसची चाचणी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली येथील ड्रायव्हिंग अँड डिझायनिंग स्पेसिफिकेशन आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशनच्या पथकाकडून बसच्या चाचणीसाठीची अद्याप वेळ निश्चित झालेली नाही. यानंतरच पहिल्या टप्प्यातील २५ बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्रीय पथकाकडून अशोक लेलँड कंपनीच्या बेळगाव येथील वर्कशॉपमध्येच ही चाचणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘केएमटी’ला फेब्रुवारी महिन्यात केंद्र शासनाकडून बस खरेदी, प्रशस्त वर्कशॉप व जीपीएस तंत्रज्ञान, आदींसाठी ४४ कोटींचा निधी मिळाला. प्रवासी क्षमता व केंद्रीय नियमावली, परिवहन सदस्यांची नेमक्या एका कंपनीला ठेका मिळविण्यासाठी राजीनामा नाट्य, तसेच टाटा मोटर्सची उच्च न्यायालयात याचिका यामुळे बस खरेदी प्रक्रिया लांबली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातील बसची चाचणी दोन महिने पुढे गेली.
बेळगाव येथील वर्कशॉपमध्ये ‘केएमटी’ला पुरवठा करण्यात येणाऱ्या बसचे मॉडेल तयार आहेत. याची नुकतीच ‘केएमटी’च्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. आवश्यक बदल सुचविले आहेत. या बसची आज, गुरुवारी चाचणी होईल अशी केएमटी प्रशासनाला अपेक्षा होती; मात्र केंद्रीय पथकाची वेळ अद्याप मिळालेली नाही. यामुळे या बसची चाचणी पुढील आठवड्यात होईल. यानंतर तीन आठवड्यांत २५ बसेस केएमटीला मिळतील. व पुढील प्रत्येक महिन्यात प्रत्येकी २५ बसेसचा पुरवठा केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
जनता गाडीला शहरातील प्रवासी घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. परिणामी केएमटीला प्रवाशांतून मोठी मागणी आहे. सध्या केएमटीला दररोज अडीच लाखांचा तोटा सहन करावा लागतो. नव्या बसेसमुळे केएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे; मात्र नवीन बस लांबणीवर पडू लागल्याने तोट्यातील केएमटीपुढील अडचणीत भरच पडत आहे.