दफनभूमीची जागा अडकली लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:00+5:302021-07-01T04:17:00+5:30
गारगोटी : अगोदरच असलेल्या दफनभूमीत दुसरी दफनभूमी मंजूर करताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आठ वर्षे पूर्ण होऊनदेखील त्याची दाहकता जाणवत ...

दफनभूमीची जागा अडकली लालफितीत
गारगोटी : अगोदरच असलेल्या दफनभूमीत दुसरी दफनभूमी मंजूर करताना जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आठ वर्षे पूर्ण होऊनदेखील त्याची दाहकता जाणवत नसल्याने शिवडाव येथील मुस्लिम समाजाला साडेपाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दफनभूमीत शव दफन करण्यासाठी खांद्यावरून वाहून न्यावे लागते.
भुदरगड तालुक्याच्या पश्चिमेला आणि पाटगाव धरणाच्या पायथ्याला शिवडाव गाव आहे. जेथून शिवडाव सोनवडे घाट रस्ता होणार आहे, ते कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव. आजपर्यंत कधीही चर्चेत नसलेल्या या गावाला घाट रस्त्याला दिलेल्या नावामुळे सर्वज्ञात झाले.
भुदरगड तालुक्यात गारगोटी, अनफ, तांबाळे, कडगाव, शिवडाव यांसारखी मोजकी गावे वगळता इतर कोणत्याही गावांत मुस्लिम समाज नाही. अल्प म्हणण्यापेक्षा अत्यल्प असलेला हा समाज हिंदू बांधवांशी एकरूप झालेला आहे.
शिवडाव येथील मुस्लिम बांधवांना शव दफन करण्यासाठी साडेपाच किमी अंतरांवरील पाटगाव दफन भूमीत घेऊन जावे लागते. शव नेण्यासाठी शववाहिक किंवा तत्सम कोणतेही वाहन नसल्याने चालत खांद्यावरून वाहून न्यावे लागते. उन्हाळ्यात कसेही जाता येते; पण पावसाळ्यात खूप त्रासदायक असते. याठिकाणी दरवर्षी चार हजार मिमी पाऊस पडत असतो. ही अडचण लक्षात घेऊन २०१३ साली तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी गावसभेत ठराव मंजूर करून हिंदू दफनभूमी शेजारील गायरान गट क्रमांक १०९ मधील दहा गुंठे जमीन मुस्लिम समाजाला दफनभूमीसाठी दिली. ग्रा.पंच्या ठरवानंतर तलाठी, मंडल अधिकारी यांनी डायरी घालून तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे पाठवली. त्यांनी ती फाईल मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली.
येथून या कार्यालयाने त्रुटी दाखवत प्रत्येक सहा महिन्यांच्या अंतराने एक त्रुटी सांगायची आणि तो दाखला मागायचा. त्याची पूर्तता केली की मग पुन्हा सहा महिन्यांनी दुसऱ्या विभागाचा दाखला मागायचा. अशा या वाऱ्या गेली आठ वर्षे सुरू आहेत.