बंटी, तुम्ही ‘मनपा’चा नाद करू नका
By Admin | Updated: January 15, 2015 00:36 IST2015-01-15T00:26:49+5:302015-01-15T00:36:07+5:30
अरुण नरके यांचा टोला : ‘गोकुळ’वर सत्ता आमचीच; वैयक्तिक रागापोटी राजकारण करू नका

बंटी, तुम्ही ‘मनपा’चा नाद करू नका
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) राजकारणात आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके व पी. एन. पाटील (मनपा) यांचा कोणी नाद करू नये, असा टोला संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी आज, बुधवारी पत्रकारांशी बोलताना हाणला. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी ‘गोकुळ’च्या मैदानात शड्डू ठोकल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेबाबात अरुण नरके यांना विचारले असता ते म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये आमदार महाडिक व पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. त्यामुळे ‘पी. एन.’ यांचे कार्यकर्ते नरकेंना मतदान करणार का? व नरकेंचे कार्यकर्ते ‘पी. एन.’ यांच्या उमेदवारांना मतदान करणार का? असे म्हणणे हास्यास्पद आहे. मनांत संशय घेऊन काम करण्याइतके आम्ही लहान नाही. ‘कुंभी’च्या निवडणुकीपासून सर्वच निवडणुकीत नरके कुटुंबांनी विश्वास निर्माण केला आहे. आम्ही पॅनेलमध्ये एकत्र आलो की प्रामाणिकपणेच काम करतो, हा इतिहास आहे. पी. एन. व आमची पंधरा वर्षांची मैत्री आहे. आम्ही एकमेकांना मदत केली आहे. सतेज पाटील यांना वाटणारी शंका अनाठायी आहे. महाडिकसाहेब व मी ४२ वर्षे एकत्र आहे. आमचे घट्ट नाते असून, विश्वास हा पाया आहे. देशपातळीवर ‘गोकुळ’चा नावलौकिक आहे, संस्थेत विरोधाला विरोध म्हणून राजकारण करणे योग्य नाही. दूध पावडरचे दर कमी झाल्याने देशभरातील दूध संघांनी दुधाचे दर कमी केले, पण ‘गोकुळ’ने दर कमी केले नाहीत. आमदार चंद्रदीप नरके व अजित नरके हे महाडिक व पी. एन. यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या पाठीशी राहतील यात शंका नाही. कोण काय म्हणतात, याला महत्त्व नसून ज्यांना सहकार समजलेला नाही, तेच लोक अशी वक्तव्ये करतात, अशी टीका अरुण नरके यांनी केली.
बंटी-महाडिक एकत्र...
निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी असल्याने पुढे काय घडणार हे कोणाला माहिती नाही. उद्या कदाचित बंटी-महाडिक हेच एकत्र येऊ शकतील, अशी मिश्कील टिप्पणीही पी. एन. पाटील यांनी केली.
राष्ट्रवादीचे ठराव स्वतंत्र देणार : के. पी. पाटील
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपल्या दूध संस्थांचे ठराव गोळा करण्याच्या सूचना माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू असून, ठराव गोळा झाल्यानंतर स्वतंत्रपणे ते साहाय्यक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे सुपूर्द केले जाणार आहेत. निवडणुकीला अजून वेळ असल्याने आताच याबाबत भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले.
सतेज, स्वत:च्या पॅनेलची काळजी करा : पी. एन. पाटील
अरुण नरकेंचे कार्यकर्ते माझ्या उमेदवारांना मतदान करणार का? माझे कार्यकर्ते त्यांना मदत करणार का? याची काळजी करण्यापेक्षा सतेज पाटील यांनी स्वत:च्या पॅनेलची काळजी करावी, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी हाणला. अजून निवडणुकीला चार महिने असल्याने बऱ्याच घडामोडी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोणी मदत करायची, हे ज्याचे त्याने ठरवावे, याबाबत आताच चर्चा करणे योग्य नाही. वैयक्तिक रागापोटी अग्रेसर दूध संघामध्ये राजकारण करणे योग्य नसल्याचेही सांगितले.