डॉल्बीधारकांना लाखाचा दणका
By Admin | Updated: October 3, 2015 00:57 IST2015-10-03T00:57:50+5:302015-10-03T00:57:50+5:30
पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल

डॉल्बीधारकांना लाखाचा दणका
एकनाथ पाटील / कोल्हापूर
गेली दोन-तीन वर्षे सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा मोडीत काढणाऱ्या ६७ सार्वजनिक मंडळांवर पोलिसांनी यंदा पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. दरम्यान, संबंधित मंडळांवर कठोर कारवाईसाठी विसर्जन मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन लवकरच या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची पोलीस प्रशासनाची तयारी सुरू आहे.
या गुन्ह्यांमध्ये बहुतांश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. या कारवाईमध्ये डॉल्बी यंत्रणेचे मालक, चालक, मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व ज्या वाहनांवर डॉल्बी यंत्रणा ठेवण्यात आली त्या वाहनांचे चालक, मालक, आदींना झटका बसणार आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांतील प्रतिसादामुळे यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरुवातीस केला. या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाऱ्या तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलीस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचे जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधनही केले होते. त्यामुळे अनेक मंडळांनी डॉल्बी लावणार नाही, असे पत्र देखील पोलिसांना दिले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी मिरवणुकीदिवशी पोलिसांच्या नाकावर टिच्चून डॉल्बी लावले. मात्र आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने डॉल्बी लावण्यापासून मंडळांना रोखू नका, असा राजकीय दबाव पोलिसांवर असल्याने विसर्जन मिरवणुकीत ऐनवेळी डॉल्बी घेऊन आलेल्या मंडळांना पोलिसांनी रोखले नाही. मात्र संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा तपासली. त्याचा अहवाल त्यांनी पोलिसांना दिला आहे. मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुमारे ६७ मंडळांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. या संपूर्ण गुन्ह्यांमध्ये शासकीय पंचांची साक्ष घेण्यात आली आहे. लवकरच डॉल्बी विरोधातील भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.
तरुणांच्या भविष्याचे नुकसान
डॉल्बीविरोधात गुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीस हजर होताना अडचणी निर्माण होऊन त्यांच्या भविष्याचे नुकसान होणार आहे.