सराफ व्यावसायिकांचा सोमवारी देशव्यापी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST2021-08-21T04:29:45+5:302021-08-21T04:29:45+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारने सक्ती केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या ...

सराफ व्यावसायिकांचा सोमवारी देशव्यापी बंद
कोल्हापूर : केंद्र सरकारने सक्ती केलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगला आमचा विरोध नाही, मात्र त्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या नव्या हॉलमार्किंग युनिक आयडी म्हणजेच दागिन्यांचा ओळख क्रमांक प्रणालीला विरोध आहे. याअंतर्गत सोमवारी (दि.२३) सराफ व्यावसायिकांनी देशव्यापी बंद पुकारला असून त्यात पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील सराफ व्यापारी सहभागी होणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, केंद्र सरकारने १६ जूनपासून २५६ जिल्ह्यांमध्ये दागिन्यांचे हॉलमार्किंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे हॉलमार्क नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. नव्या प्रणालीनुसार त्या दागिन्यावर केलेल्या हॉलमार्कचा ओळख क्रमांक नोंदवायचा आहे. हा नंबर पोर्टलवर टाकला की ग्राहकाला त्याच्या दागिन्यांची सर्वंकष माहिती मिळते. मात्र ही प्रक्रिया अतिशय किचकट, वेळ खाऊ आहे. देशात दरवर्षी सुमारे १० ते १२ कोटी दागिने तयार होतात. याशिवाय सध्या ७ कोटी दागिन्यांचे हॉलमार्क करणे बाकी आहे. त्यानुसार वर्षाला ही संख्या १६ ते १८ कोटी दागिन्यांपर्यंत जाते. पण त्या प्रमाणात हॉलमार्किंग केंद्र नाहीत, त्यांची क्षमता दिवसाला २ लाख दागिने इतकी आहे. या वेगाने या वर्षाचे उत्पादन चिन्हांकित करण्यासाठी ४ वर्ष लागतील. सध्याची हॉलमार्क ओळख क्रमांक प्रणालीनुसार एका दागिन्यावर हॉलमार्क करण्यासाठी ५ ते १० दिवस लागत आहेत. त्यामुळे उद्योग ठप्प झाला आहे, उलाढाल थांबली आहे. दागिने तयार आहेत पण विकता येत नाही अशी स्थिती आहे. नोंदणीत काही चूक झाली की किंवा दागिन्यात काही बदल झाले की सराफ दुकानांवरच दंड, दुकाने सील करणे अशी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांचा या नव्या प्रणालीला विरोध आहे. आमची मागणी केंद्र सरकारला कळावी यासाठी सोमवारी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे.
---