डिसेंबरअखेरपर्यंतच बांधकाम परवाने ऑफलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:44+5:302021-09-18T04:25:44+5:30
कोल्हापूर : ऑनलाइन बांधकाम प्रणालीत अनेक त्रुटी आणि दोष आहेत. ते दूर करेपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबर २०२१ अखेेर बांधकाम ...

डिसेंबरअखेरपर्यंतच बांधकाम परवाने ऑफलाइन
कोल्हापूर : ऑनलाइन बांधकाम प्रणालीत अनेक त्रुटी आणि दोष आहेत. ते दूर करेपर्यंत म्हणजे ३१ डिसेंबर २०२१ अखेेर बांधकाम परवाने ऑनलाइनसह ऑफलाइनही देण्याची मुभा सरकारच्या नगरविकास विभागाने नुकतीच दिली. ऑफलाइनमुळे ऑनलाइन परवान्याविना रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांना गती येणार आहे. नगरविकास विभागाने ५ मे २०२१ पासून बांधकाम परवाने फक्त ऑनलाइनच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली, मात्र ऑनलाइन प्रणालीतील दोषांमुळे बांधकाम परवाने मिळण्यास विलंब होत आहे. परवान्याचे प्रस्ताव रखडल्याने बांधकाम व्यावसायिक आणि नवीन घर बांधू इच्छिणारे नगररचना कार्यालयात हेलपाटे मारून हैराण झाले होते. कोरोनामुळे मंदीचे सावट त्यामध्ये बांधकाम परवान्यास विलंबाचा सर्वाधिक फटका बांधकाम प्रकल्पांना बसला. म्हणून पूर्वीप्रमाणे बांधकाम परवाने ऑफलाइन पध्दतीने देण्याची मागणी होती. त्याची दखल घेत सरकारच्या नगरविकास विभागाने ऑफलाइन प्रणातील त्रुटी दूर करेपर्यंत पुढील तीन महिन्यापर्यंत ऑफलाइन पध्दतीने बांधकाम परवानगी देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाकडे भोगवटा, जोथा तपासणी, पुनर्परवानगी, तात्पुरते रेखांकन, अंतिम रेखांकन, एकत्रीकरण- विभाजन, नूतनीकरण, सुरक्षा भिंत बांधकाम करण्यासाठीचे ऑनलाइन, ऑफलाइन आलेले २३० प्रस्ताव निकालात निघणार आहेत. ऑफलाइनमुळे बांधकाम परवाने त्वरित मिळणार आहेत.
कोट
ऑनलाइन बांधकाम परवान्याच्या प्रणालीतील गंभीर त्रुटीमुळे अनेक बांधकाम परवाने प्रलंबित राहिले होते. आता ऑफलाइन परवाने देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे वेळेत बांधकाम परवाने मिळतील. बांधकाम प्रकल्पांना गती येईल.
- सचिन ओसवाल, बांधकाम व्यावसायिक, व्यवस्थापकीय संचालक, रामसीना ग्रुप
कोट
ऑनलाइन बांधकाम परवान्याच्या प्रणालीमध्ये काही दोष आहेत. ही प्रणाली गतिमान नसल्याने अडचणी येत आहेत. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच ऑफलाइन परवाना देण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. १ जानेवारी २०२२ पासून फक्त ऑनलाइनच बांधकाम परवाने मिळतील.
- रमेश मस्कर, उपनगर रचनाकार, महापालिका नगररचना विभाग