यंत्रमागासाठी अर्थसंकल्पात तरतुदी
By Admin | Updated: January 16, 2017 00:03 IST2017-01-16T00:03:19+5:302017-01-16T00:03:19+5:30
स्मृती इराणी यांची ग्वाही : राजू शेट्टी यांची माहिती; तांत्रिक उन्नयन योजनेंतर्गत अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता

यंत्रमागासाठी अर्थसंकल्पात तरतुदी
राजाराम पाटील ल्ल इचलकरंजी
वस्त्रोद्योगामधील विणकाम क्षेत्रात अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. त्यातील यंत्रमाग घटकांसाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या तरतुदींचा समावेश केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात असेल, अशी ग्वाही वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी दिली असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी सांगितली. त्यामध्ये प्रामुख्याने तांत्रिक उन्नयन योजनेंतर्गत (टफ्स) देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ वस्त्रोद्योगामध्ये आर्थिक मंदी आहे. त्यामधील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला यंत्रमाग उद्योग या मंदीमध्ये भरडला जात आहे. सूत आणि विजेचे वाढलेले दर आणि उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कापडाला मिळत नसलेला भाव यामुळे यंत्रमागधारक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. म्हणून एक वर्षापूर्वी तत्कालीन वस्त्रोद्योगमंत्री सुरेश गंगवाल यांची खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली यंत्रमागधारकांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली होती. नवी दिल्ली येथे झालेल्या या भेटीत यंत्रमाग उद्योगासमोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटाची माहिती मंत्र्यांना दिली. त्याचबरोबर सुलभ आणि अधिक रोजगार देणारा हा उद्योग केंद्र सरकारने टिकविला पाहिजे आणि यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी मदत दिली पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या त्यांच्याकडे केल्या होत्या.
त्यानंतर काही कालावधीमध्ये केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळामध्ये झालेल्या फेरबदलात वस्त्रोद्योग खाते हे स्मृती इराणींकडे देण्यात आले. दरम्यानच्या काळात यंत्रमाग उद्योजकांची आणखीन परिस्थिती बिघडत गेली. म्हणून खासदार शेट्टी यांनी यंत्रमाग उद्योगामधील काही प्रतिनिधींना घेऊन मंत्री इराणी यांची भेट घेतली. सुमारे दीड तासांहून अधिक काळ झालेल्या बैठकीमध्ये मंत्र्यांनी वस्त्रोद्योग आणि त्यातील यंत्रमाग उद्योगासमोर असलेल्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या होत्या.
यंत्रमाग उद्योगासमोर असलेल्या समस्या व त्यावर मागणी होत असलेली उपाययोजना यासंदर्भात वस्त्रोद्योग खात्याकडे असलेल्या विभागीय कार्यालयांकडून माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर संसदेचे हिवाळी अधिवेशन झाले, पण वस्त्रोद्योग खात्याकडून यंत्रमाग उद्योगाविषयी साहाय्यभूत ठरणाऱ्या तरतुदींबाबत हालचाली जाणून घेण्यासाठी खासदार शेट्टी यांनी वस्त्रोद्योगमंत्री इराणी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली येथे झालेल्या वस्त्रोद्योग मंत्रालयात मंत्री इराणी व खासदार शेट्टी यांच्या बैठकीमध्ये यंत्रमाग उद्योजकांच्या समस्या, त्यांच्याकडून आलेल्या मागण्या आणि वस्त्रोद्योग विभागाकडून आलेला अहवाल यांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर इराणी यांनी, १ फेब्रुवारी रोजी घोषित होणाऱ्या केंद्र सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पात वस्त्रोद्योग व यंत्रमाग घटकांसाठी साहाय्यभूत ठरणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव निश्चितपणे होईल, अशी ग्वाही दिली असल्याचे खासदार शेट्टी यांनी या प्रतिनिधींबरोबर बोलताना स्पष्ट केले.
यंत्रमाग उद्योगाच्या मागण्या
देशात सर्वत्र यंत्रमाग उद्योगासाठी असलेले वीज दर समान असावेत, वीज दर समान ठेवण्यासाठी केंद्र सरकारने संबंधित राज्य सरकारना साहाय्य करावे,
कापूस- सूत- कापड यांचे आयात-निर्यात धोरण स्थिर असले पाहिजे
देशांतर्गत असलेल्या खपाचे कापूस व सुताचे सरकारने आरक्षण करावे, कापडाच्या आयात करामध्ये वाढ करावी,
सुताच्या आयात करामध्ये घट करावी, टफ्स योजनेंतर्गत
असलेले दहा टक्के अनुदान
तीस टक्के करावे.
यंत्रमागाचे रॅपियर लूममध्ये रूपांतर करण्याकरिता केंद्र व राज्य सरकारने यंत्रमागधारकांना अनुदान द्यावे.