बालकाची क्रूरपणे हत्या : महिलेला सात वर्षे शिक्षा
By Admin | Updated: June 13, 2014 01:59 IST2014-06-13T01:38:54+5:302014-06-13T01:59:13+5:30
विहिरीत फेकून देऊन त्याची क्रूरपणे हत्या

बालकाची क्रूरपणे हत्या : महिलेला सात वर्षे शिक्षा
कोल्हापूर : घरातून हाकलल्याचा राग मनात धरून विक्रमनगर येथील चार वर्षांच्या बालकाला शिरोली (ता. हातकणंगले) मधील विहिरीत फेकून देऊन त्याची क्रूरपणे हत्या केल्याप्रकरणी महानंद ऊर्फ अंजू राजू नवगुंदे (वय ३५, रा. आंबेडकरनगर, नागाव, ता. हातकणंगले) हिला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, विक्रमनगर येथील स्वाती राजू कांबळे हिचा दीर शशिकांत बाळू कांबळे याने रखेल म्हणून महानंद नवगुंदे हिला नागाव (ता. हातकणंगले) येथील आंबेडकरनगर येथे खोली घेऊन ठेवले होते. दरम्यानच्या कालावधीत शशिकांत व महानंद यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर शशिकांत हा विक्रमनगर येथे आई, वडील व भावजय स्वाती यांच्या घरी सासू, सासरे व स्वातीची दोन मुले पवन (वय ४) व जीवन (२) असे एकत्रित राहू लागला. त्यानंतर महानंद ही विक्रमनगरात राहावयास आली. त्यावेळी तिला स्वातीने हाकलून दिले. हा राग मनात धरून १८ नोव्हेंबर २०११ रोजी दुपारी पवनला तिने पळवून नेऊन शिरोलीतील पंडित पाटील यांच्या शेतातील विहिरीत टाकले. त्यानंतर स्वाती कांबळे यांच्या घरातील लोकांनी पवनची शोधाशोध केली. त्यावेळी त्यांची शेजारीण शकुंतला बामणे हिने महानंद हिला पवनला घेऊन जाताना पाहिले होते. याबाबतची फिर्याद स्वाती कांबळे यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात देऊन संशयित महानंदवर संशय व्यक्त केला होता. पोलीस उपनिरीक्षक पी. बी.जाधव यांनी तपास केला. नागावमध्ये महानंद मिळून आली. मात्र, पवनची माहिती देण्यास ती टाळू लागली.
या खटल्यात सरकारी वकील सुलक्ष्मी पाटील यांनी एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यानंतर सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अशोक एन. रणदिवे यांनी आरोपीने केलेल्या कृत्याबाबत कठोर कारवाई व्हावी, असा युक्तिवाद जमादार यांच्यासमोर केला.आरोपी व पवन यांना शेवटी शंकुतला बामणे यांनी एकत्र पाहिले होते व शशिकांतने महानंदला सोडून देऊन संबंध तोडले होते. याचा बदला म्हणून आरोपीने हे कृत्य केले, असे न्याायालयाला रणदिवे यांनी पटवून दिले. सरकारी पक्षाचा तोंडी पुरावा व रणदिवे यांच्या तक्रारी ग्राह्य धरून सदोष मनुष्यवधाखाली सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी)