अपहरण झालेल्या सोनाळीच्या बालकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:11+5:302021-08-21T04:28:11+5:30
मुरगूड : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा सावर्डे ...

अपहरण झालेल्या सोनाळीच्या बालकाचा निर्घृण खून
मुरगूड : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा सावर्डे बुद्रुक येथे निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या बालकाच्या वडिलांच्या मित्रानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हा खून नरबळीच असल्याचे बोलले जात आहे; पण याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. या घटनेप्रकरणी सोनाळी (ता. कागल) येथील दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५) या संशयित आरोपीला मुरगूड पोलिसांनी अटक केली. साडेसहाच्या सुमारास सोनाळी येथे वरदच्या मृतदेहावर हजारोंच्या संख्येने अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सावर्डे बुद्रुक येथे, ‘आरोपीला ताब्यात द्या,’ या मागणीसाठी तब्बल दोन तास मृतदेह रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
सोनाळी येथील वरद पाटील हा आपले आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरी वास्तुशांत समारंभासाठी गेला होता. तो मंगळवारी (दि. १७) रात्री आठपासून बेपत्ता होता. रात्रभर घरच्यांनी त्याचा शोध घेतला; पण तो न मिळाल्यामुळे त्यांनी बुधवार (दि. १८) मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मुरगूड पोलिसांनी दोन दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवून बुधवारी संशयित म्हणून दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला ताब्यात घेतले होते. वैद्य हा वास्तुशांत समारंभासाठी सावर्डे या गावी गेला होता. त्याला सावर्डेमधील काहींनी वरदबरोबर पाहिले होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांचा संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविताच त्याने आपण वरदचे अपहरण केले असून, त्याचा खून केल्याची कबुली गुरुवारी मध्यरात्री पोलिसांना दिली.
शुक्रवारी पहाटे मुरगूड पोलिसांनी सोनाळी आणि सावर्डे या दोन्ही गावी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर मारुती वैद्य याला घेऊन ज्या ठिकाणी वरदचा खून केला, ते ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला; पण वरदचा खून हा रात्री झाल्याने आरोपीला ठिकाण सापडताना अडचणी आल्या. सावर्डेतील गावतलावापासून बाबूराव आनंदराव जाधव यांच्या पायरीचा माळ या परिसरातील खुळा पिंपळ या परिसरात वरदला निर्दयपणे मारून त्याचा मृतदेह लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले.
त्यानंतर आरोपी वैद्य याला पुन्हा मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये कस्टडीत ठेवले. वरदचा मृतदेह सापडल्याची कुणकुण सावर्डे आणि सोनाळी या गावांत लागल्याने आणि सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती प्रसिद्ध झाल्याने सावर्डेमध्ये नातेवाइकांसह ग्रामस्थांची तोबा गर्दी झाली. पोलीस पंचनामा झाल्यानंतर मृतदेहाची तपासणी करण्यासाठी रुग्णवाहिकेतून तो कोल्हापूरला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या; पण आरोपीला आमच्यासमोर हजर करा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या मांडला.
अखेर डीवायएसपी आर. आर. पाटील व सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी तपास निःपक्षपाती करून आरोपींना शिक्षा देण्याचे अभिवचन दिल्यानंतर ग्रामस्थांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यानंतर बंदोबस्तात मृतदेह कोल्हापूरला पाठविण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वरदच्या पश्चात आई, वडील, सहा महिन्यांचा भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, डीवायएसपी आर. आर. पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.
२० वरद पाटील