अपहरण झालेल्या बालकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:09+5:302021-08-21T04:28:09+5:30
मुरगूड, जि. कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा ...

अपहरण झालेल्या बालकाचा निर्घृण खून
मुरगूड, जि. कोल्हापूर : तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा सावर्डे बुद्रुक येथे निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या बालकाच्या वडिलांच्या मित्रानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हा खून नरबळीच असल्याचे म्हटले जात आहे; पण याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.
या घटनेप्रकरणी सोनाळी (ता. कागल) येथील दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५) या संशयित आरोपीला मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोनाळी येथे वरदच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, सावर्डे बुद्रुक येथे ‘आरोपीला ताब्यात द्या’ या मागणीसाठी तब्बल दोन तास मृतदेह रोखून धरल्याने तणाव निर्माण झाला होता.
सोनाळी येथील वरद पाटील हा आपले आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे (रा. सावर्डे बुद्रुक, ता. कागल) यांच्या घरी वास्तुशांत समारंभासाठी गेला होता. तो मंगळवारी (दि. १७) रात्री आठ वाजल्यापासून बेपत्ता होता. रात्रभर घरच्यांनी त्याचा शोध घेतला; पण तो न सापडल्यामुळे त्यांनी बुधवार (दि. १८) मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये त्याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. मुरगूड पोलिसांनी बुधवारी संशयित म्हणून दत्तात्रय ऊर्फ मारुती वैद्य याला ताब्यात घेतले होते. वैद्य हा वास्तुशांत समारंभासाठी सावर्डे गावी गेला होता. त्याला सावर्डेमधील काहींनी वरदबरोबर पाहिले होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण वरदचे अपहरण केले असून, त्याचा खून केल्याची कबुली गुरुवारी मध्यरात्री पोलिसांना दिली.
शुक्रवारी पहाटे मुरगूड पोलिसांनी सोनाळी आणि सावर्डे या दोन्ही गावी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. सावर्डेतील गाव तलावापासून बाबूराव आनंदराव जाधव यांच्या पायरीचा माळ या परिसरातील खुळा पिंपळ या परिसरात वरदला निर्दयीपणे मारून त्याचा मृतदेह लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. वरदच्या पश्चात आई, वडील, सहा महिन्यांचा भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शन केले.
संशयिताला फाशी देण्याची मागणी
वरद पाटील याचा मृतदेह सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरल्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. सुमारे अडीच ते तीन हजार लोक जमले होते. पोलीस बंदोबस्तात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरला नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जमलेले ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले होते. त्यांनी तब्बल दोन तास मृतदेह रोखून धरला.
संशयित आरोपीला ताब्यात द्या, ही एकच मागणी त्यांनी लावून धरली होती. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केल्यानंतर बारा दिवसांच्या आत आरोपीला फाशी द्या, या एकाच मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिले.