ब्राऊन शुगर उत्पादनाची गरज
By Admin | Updated: May 28, 2015 01:12 IST2015-05-28T01:08:34+5:302015-05-28T01:12:58+5:30
संजीब पटजोशी : साखर परिषदेस प्रारंभ, साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना पुरस्कार प्रदान

ब्राऊन शुगर उत्पादनाची गरज
कोल्हापूर : साखर उद्योगाला चांगले दिवस येण्यासाठी सर्वच साखर कारखान्यांनी ब्राऊन शुगर उत्पादित करणे ही काळाची गरज आहे, असे मत वैकुंंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ को-आॅपरेटिव्ह मॅनेजमेंटचे संचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक संजीब पटजोशी यांनी बुधवारी व्यक्त केले.
येथील राजाराम महाविद्यालयाच्या सभागृहात भारतीय शुगर यांच्यातर्फे दोन दिवस आयोजित साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पटजोशी म्हणाले, इंधनाची मोठी मागणी आहे; त्यामुळे कारखानदारांनी इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे. ब्राऊन शुगर तयार करावी. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना अतिशय चांगल्या आहेत. हे दोन्ही विमे साखर उद्योगातील अधिकाधिक कामगारांनी उतरावेत, यासाठी कारखानदारांनी पुढाकार घ्यावा.
निराणी म्हणाले, देशात मोठा समजला जाणारा साखर उद्योग अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांसाठी साखरेचा दर कमी आणि उपपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्यांना लागणाऱ्या साखरेला भाव अधिक, अशी व्यवस्था तयार केल्यास ऊस उत्पादकांचा चांगला दर देणे शक्य आहे. साखर कारखानदार अमित कोरे, पुणे येथील इंडियाना सुक्रोटेकचे प्रमोदकुमार बेलसरे, एम. एस. सुंदरम यांचे भाषण झाले. मुरगेश निराणी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संग्रामसिंह शिंदे, विक्रमसिंह शिंदे, अविनाश मुधोळकर, डॉ. जे. आर. पाटील, आदी उपस्थित होते.