ब्रिटिशकालीन बंधारा स्फोटाने उडविला!
By Admin | Updated: May 27, 2015 01:19 IST2015-05-27T01:12:01+5:302015-05-27T01:19:26+5:30
वाळूमाफियांची मुजोरी : कांबळेश्वर येथे निरा नदीतून लाखो लिटर पाणी वाया; गुन्हा दाखल

ब्रिटिशकालीन बंधारा स्फोटाने उडविला!
फलटण : कांबळेश्वर (ता. फलटण) येथील निरा नदीवरील फलटण व बारामती तालुक्यांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यावरील गाळा क्रमांक २९, ३० मधील दगडी खांब मंगळवारी अज्ञातांनी जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून उडवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे बंधाऱ्यातील हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पणदरे (ता. बारामती) येथील पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी सतीश कोकाटे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (दि. २६) पहाटे दोनच्या सुमारास अज्ञातांनी कांबळेश्वर (ता. फलटण) येथे निरा नदीवरील पहाटे अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे ग्रामस्थ घटनास्थळी धावून गेले असता, त्यांनी बंधाऱ्याला मोठे भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. स्थानिक ग्रामस्थांनी याची माहिती तत्काळ प्रशासनाला दिली.
यावेळी फलटणचे तहसीलदार विवेक जाधव, फलटण ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, फलटण काँग्रेसचे पदाधिकारी अनिल तावरे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
वाळू तस्कारांचे कारनामे?
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ‘हे कृत्य वाळू तस्करांचे असावे,’ असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या परिसरात बारामती तालुक्यातील वाळू तस्करांचा मोठा वावर असतो. संबंधित बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा असल्याने बंधाऱ्यातील पाणी कमी करुन त्यामधील वाळूसाठा काढण्यासाठीच स्फोट घडवल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या गाळा क्र. २९ व ३० मधीळ दगडी खांब जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणला. यामुळे लोखंडी प्लेटा व लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे.