ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण

By Admin | Updated: July 31, 2014 23:21 IST2014-07-31T22:37:42+5:302014-07-31T23:21:04+5:30

कागल पोलीस ठाणे : जागा, निधी मंजूर होऊनही इमारतीची प्रतीक्षा कायम

British building dilapidated | ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण

ब्रिटिशकालीन इमारत जीर्ण

जहाँगीर शेख- कागल
कागल पोलीस ठाण्याच्या संशयित आरोपी ठेवण्याच्या लॉकअप गार्डची इमारत जीर्ण अवस्थेत आली आहे. जुन्या काळातील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीसाठी जयसिंगराव पार्कात जागा आणि निधी मंजुरीची घोषणा होऊन हा विषय प्रलंबितच राहिला आहे. चार दिवसांपूर्वी या लॉकअप गार्डमधून आरोपी दिवसाढवळ्या पळून जाण्याच्या प्रकाराने कागल पोलीस ठाण्याच्या इमारतीचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.
कागल हे संस्थानकालीन शहर असल्याने येथे ब्रिटिशकाळापासून असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या इमारतीतच स्वातंत्र्यानंतरही पोलीस ठाणे सुरू राहिले.
पोलीस ठाण्याची ही दगडी इमारत भक्कम आहे; पण छप्पर कमकुवत झाले आहे. जागाही अपुरी पडत आहे, तर संशयित आरोपी न्यायालयीन आणि पोलीस कोठडीच्या काळात तसेच अटक करून न्यायालयात हजर करण्यापूर्वीच्या काळात ठेवण्यासाठी जे लॉकअप गार्ड किंवा कारागृह आहे तेही ब्रिटिशकालखंडातील आहे. ही इमारत म्हणजे तत्कालीन घाटगे संस्थानिकांच्या राजवाड्याबाहेरील घोड्याची पाग होती. याच राजवाड्यातील तहसील कार्यालय काही वर्षांपूर्वी प्रशासकीय इमारतीत हलविण्यात आले; मात्र पोलीस ठाण्याचे हे लॉकअप अजून आहे तिथेच आहे.
इमारत दुरुस्ती करता येत नाही. कारण नवी इमारत जयसिंगराव पार्कातील फौजदार बंगला येथे बांधण्याचे निश्चित झाले आहे. शासनाकडून मंजुरीही मिळालेली आहे. त्यामुळे हे लॉकअप गार्ड म्हणजे पोलिसांसाठी धोकादायक ठिकाण बनलेले आहे. कपिल सातवेकर या संशयित आरोपीने हातात बेड्या असताना केवळ दरवाजाला हिसडा मारून कडी कोयंड्याची बिजागिरी निखळली. ही अवस्था दरवाजांची, तर इमारतीच्या छताचा भाग कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. याच इमारतीच्या जवळील तहसील कार्यालयाच्या दर्शनी असणाऱ्या इमारतीचे छत या पावसाळ्यात कोसळले आहे. एकूणच हे कागलचे लॉकअप गार्ड पोलिसांच्या बरोबरच कैद्यांसाठीही धोक्याचे ठिकाण बनले आहे.

Web Title: British building dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.