जनहिताच्या विरोधातील सरकारला वठणीवर आणा
By Admin | Updated: July 3, 2016 21:25 IST2016-07-03T21:25:17+5:302016-07-03T21:25:17+5:30
हसन मुश्रीफ : यमगे येथे शेतकरी मेळावा, सत्कार समारंभ, पाणीपूजन कार्यक्रम

जनहिताच्या विरोधातील सरकारला वठणीवर आणा
मुरगूड : अच्छे दिन आणण्याच्या नावाखाली सत्तेवर आलेले भाजपचे सरकार विविध शासकीय योजना धडाधड रद्द करत आहे. सर्वसामान्यांना मिळणारे केरोसिन, स्वस्त धान्य, आरोग्य सेवा, बांधकाम कामगारांच्या योजना, आदींना खो घालून या भाजप सरकारने आपण जनहिताच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे सरकारला उलथून टाकण्यास जरी अवधी असला, तरी आंदोलनाच्या माध्यमातून वठणीवर आणण्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
यमगे (ता. कागल) येथे हसन मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून मारलेल्या तीन कूपनलिकांचे पाणीपूजन तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक शंकरराव पाटील होते. यावेळी यमगे गावासाठी मुश्रीफ यांनी निधी दिल्याबद्दल उपसरपंच मारुती पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीमध्ये मुरगूड केंद्रात पहिला आलेला आशुतोष विभूते, सायली कांदळकर व बिरदेव डोणे यांचा सत्कार मुश्रीफांच्या हस्ते पार पडला.
राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष शामराव पाटील यांनी स्वागत केले, तर माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेळाव्यास युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, सरपंच सुजाता पाटील, शंकरराव किल्लेदार, माजी उपसरपंच अशोक हुल्ले, मोहन किल्लेदार, चंद्रकांत कांदळकर, बी. के. साठे, राजू सावंत, हरिभाऊ कुंभार, मुरगूड बँकेचे संचालक साताप्पा पाटील, रणजित पाटील, दत्ता पाटील, शोभा गुरव, परशराम डोणे, विजया कुंभार, संदीप पाटील, तानाजी कुंभार, आदी प्रमुख उपस्थित होते. जहाँगीर नायकवडी यांनी आभार मानले.