श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना घरी बसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:08 IST2017-02-15T01:08:53+5:302017-02-15T01:08:53+5:30
सुजित मिणचेकर : शिरोलीत शाहू-स्वाभिमानी आघाडीची प्रचारसभा

श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना घरी बसवा
शिरोली : शासनाच्या योजना आणि स्थानिक आमदार निधीतून झालेल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम महाडिक आणि कंपनी करीत आहे. दुसऱ्याचे श्रेय लाटणाऱ्या महाडिकांना या निवडणुकीत घरी बसवा, असे आवाहन आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी केले. शिरोलीतील बिरदेव मंदिर येथे शाहू-स्वाभिमानी आघाडीच्या प्रचार प्रारंभी आयोजित समारंभात ते बोलत होते.
यावेळी आमदार मिणचेकर म्हणाले, शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामपंचायतीला थेट निधी मिळू लागला आहे. या कामाचे श्रेय आमदार, जिल्हा परिषद सदस्यांनी घेऊ नये. त्यांच्या विकासकामांच्या यादीत आमदार, खासदार व शासकीय योजनांसह मी केलेल्या विकासकामांचाही समावेश आहे. हद्दवाढ आंदोलनात शिरोली गाव दहा दिवस बंद ठेवून महामार्गावर उतरले होते. त्यावेळी भाजपचे आमदार पोलिस केस होईल या भीतीने रस्त्यावर उरले नाहीत. तर जिल्हा परिषद सदस्य या आंदोलनाकडे फिरकले सुद्धा नाहीत. अशा जिल्हा परिषद सदस्यांना सूज्ञ मतदार घरीच बसविणार आहेत.
वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी आम्हाला दिलेली कोणतीच आश्वासने महाडिकांनी पूर्ण केली नाहीत. म्हणूनच या निवडणुकीत महाडिक यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. सर्वसामान्य जनता स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार रूपाली अनिल खवरे, सुधीर सुभाष पाटील, सुमन प्रल्हाद खोत यांच्या पाठीशी उभे राहील.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महेश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुरेश यादव, जिल्हा परिषदेचे उमेदवार रूपाली खवरे, पंचायत समितीचे उमेदवार सुधीर पाटील आणि सुमन खोत, संभापूरचे माजी सरपंच प्रकाश झिरंगे, अभिनंदन सोळांकुरे, एम. बी. पाटील, सतीश चौगुले यांची भाषणे झाली.
यावेळी महावीर पाटील, गणपती माळी, विजय पोवार, अनिल खवरे, तासगावचे संपत पाटील, प्रल्हाद खवरे, दीपक यादव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
विरोधकांचा पराभव निश्चित
विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांचा पराभव केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीतही नागावचे बंटी पाटील पुन्हा महाडिकांना पराभूत करतील. त्यामुळे या निवडणुकीत बंटींच्या विरोधकांचा पराभव निश्चित आहे, असे आमदार मिणचेकर म्हणाले.