ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
कोल्हापूर : अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. .
संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची कार्यवाही १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीमधून महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
--
शिष्यवृत्ती अप्राप्त विद्यार्थ्यांना आवाहन
कोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी २०१६-१७ व २०१७-१८ या कालावधीसाठी अर्ज भरूनही लाभ अप्राप्त असल्याबाबत आपल्या महाविद्यालयांत संपर्क साधावा. विद्यार्थ्यांनी बँकेचा आवश्यक तपशील आपल्या महाविद्यालयास पुरवावे व महाविद्यालयांनी अशा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव १४ जानेवारीपर्यंत समाजकल्याण कार्यालयास सादर करावा, असा आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
ज्या विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही अशाच विद्यार्थ्यांचे योग्य खाते क्रमांक व आयएफएससी क्रमांक विहित केलेल्या नमुन्यात हार्ड कॉपी व सॉफ्टकॉपी, आजच्या तारखेपर्यंत अद्यावत केलेली बँक पासबुकची झेरॉक्स, जुने खाते बंद असल्यास संबंधित बँकेचे पत्र, नवे खाते सुरू केले असल्यास त्याची झेरॉक्स सादर करावी. याबाबत महाविद्यालय स्तरावरून त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
--
माजी सैनिकांना कार्यालयात हजर राहण्याचे आवाहन
कोल्हापूर : जिल्ह्यातील १९७१ च्या पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या व ज्यांना ज्यांना निवृत्तीवेतन किंवा केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून मासिक, वार्षिक चरितार्थ आर्थिक मदत मिळत नाही, अशा माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सैनिकांनी १९७१ च्या पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतल्याबाबतच्या पुराव्याची छायांकीत प्रत, डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र घेऊन कार्यालयीन वेळेत १५ जानेवारीपर्यंत हजर राहावे, असे आवाहन अधिकारी प्रदीप ढोले यांनी केले आहे.
--