दाम्पत्यास साडेतेरा लाखांचा गंडा
By Admin | Updated: January 12, 2016 01:01 IST2016-01-12T00:58:03+5:302016-01-12T01:01:27+5:30
फडणविसांना साकडे: हिरोंचे चेहरे ओळखण्याचे आमिष दाखवून दूरचित्रवाहिनीचे कृत्य

दाम्पत्यास साडेतेरा लाखांचा गंडा
कोल्हापूर : ‘हिंदी चित्रपटांतील हिरो-हिरॉईनचे चेहरे ओळखा आणि ३० लाख रुपये जिंका’ अशी एका खासगी दूरचित्रवाहिनीने जाहिरातीचे आमिष दाखवून कुटुंबाला साडेतेरा लाख रुपयांना गंडा घातला आहे. बक्षिसाच्या आमिषाने स्थावर मालमत्ता व सोने विकून आम्ही कंगाल झालो. आम्हाला न्याय न मिळाल्यास आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदन महेश रामचंद्र सूर्यवंशी (रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. दूरचित्रवाहिन्यांवर प्रदर्शित होणाऱ्या हिरो-हिरॉईनचे फोटो ओळखा आणि ३० लाख रुपये जिंका या स्पर्धेत महेश सूर्यवंशी यांच्या मुलांनी भाग घेतला होता. त्यांनी एका दूरचित्रवाहिनीवर अमिताभ बच्चन व विराट कोहली यांचे फोटो मे २०१५ मध्ये ओळखले. त्यावर त्यांना ३० लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचा दूरध्वनी आला. त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर सुरुवातीस एक हजार रुपये भरले. त्यानंतर ‘त्या’ अनोळखी व्यक्तीने वारंवार फोन करून जून ते आॅक्टोबर २०१५ अखेर सुमारे १३ लाख ४० हजार २५० रुपये भरून घेतले. त्या व्यक्तीने केलेल्या फोनचे लोकेशन झारखंड, छत्तीसगड व दिल्ली येथील आहे. सूर्यवंशी यांनी बँकेत भरलेल्या पावतीमध्ये आरती कुमार, राजीव कुमार, शिवेंद्र शर्मा आदींची नावे आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुषमा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, कागल पोलीस ठाणे आदींच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते; परंतु या पथकाच्या हाती अद्याप कोणतेच धागेदोरे लागलेले नाही. (प्रतिनिधी)