पेठवडगावात लाचखोर सहायक फौजदार अटकेत
By Admin | Updated: September 6, 2015 00:35 IST2015-09-06T00:35:28+5:302015-09-06T00:35:28+5:30
तडजोडीने मिटलेले प्रकरण : अटकेची भीती दाखवून साडेचार हजार स्वीकारताना जाळयात

पेठवडगावात लाचखोर सहायक फौजदार अटकेत
पेठवडगाव : न्यायालयात तडजोडीने मिटलेल्या प्रकरणात अटकेची भीती दाखवून लाच स्वीकारणाऱ्या वडगाव पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार सर्जेराव शंकर डवरी (वय ५३) याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही घटना शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली याप्रकरणी वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे.
तक्रारदार विनोद गायकवाड (रा. वाठार) व त्यांच्या घरातील लोकांच्या विरोधात वडगावच्या दिवाणी न्यायालयात २0१३ मध्ये गुन्हा नोंद होता. याबाबतची फिर्याद दीपक चौगुले यांनी दिली होती. याचा तपास सहायक फौजदार सर्जेराव डवरी करीत होता. दरम्यान, गायकवाड व चौगुले यांच्यात न्यायालयात आपापसात तडजोड झाली. त्यामुळे हे प्रकरण मिटले होते. गायकवाड यांना डवरीने ४ सप्टेंबरला बोलावून घेतले होते. न्यायालयात तुमच्या बाजूने अहवाल पाठवितो. यासाठी गायकवाड यांच्याकडे पाच हजार रुपये देण्याची मागणी केली.
गायकवाड यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार के ली. खात्री केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वडगावमध्ये पोलीस ठाण्यानजीकच्या व्यापारी संकुलातील फूड कॉर्नर येथे सापळा लावला. येथे गायकवाड यांच्याकडून डवरी यांने चारहजार पाचशे रुपये लाच स्वीकारली. यावेळी त्यास रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सुनील वायदंडे, हवालदार श्रीधर सावंत. जितेंद्र शिंदे, संदीप पावलेकर, संजय गुरव यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)