लाचप्रकरणी अभियंत्याच्या शेटफळेतील घरावर छापा
By Admin | Updated: July 21, 2014 00:27 IST2014-07-21T00:07:43+5:302014-07-21T00:27:50+5:30
तासभर तपासणी : सांगलीच्या पथकाची कारवाई

लाचप्रकरणी अभियंत्याच्या शेटफळेतील घरावर छापा
सांगली : भंडारा जिल्ह्यात लाच घेताना सापडलेल्या उपसा सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता सीताराम भोरे याच्या शेटफळे (ता. आटपाडी) येथील घरावर आज रविवारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला. तासभर घराची झडती घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
भोरे हा भंडारा येथील विद्युत जलउपसा सिंचन विभागात कार्यकारी अभियंता आहे. नागपूर येथील एका ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी त्याने दोन लाख रुपयांची लाच मागितली. चर्चेअंती ठेकेदाराने एक लाख साठ हजारांची लाच देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर ठेकेदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दाखल केली होती. या विभागाने लावलेल्या सापळ्यात भोरे यास एक लाख साठ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई काल (शनिवार) झाली आहे. त्यानंतर भंडाऱ्यातील त्याच्या घरावर छापा टाकून तपासणी करण्यात आली होती.
भोरे मूळचा शेटफळे येथील आहे. भंडाऱ्याच्या पथकाने सांगलीच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून त्याच्या घरावर छापा टाकून मालमत्तेचा शोध घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार उपअधीक्षक आफळे यांच्या पथकाने रविवारी छापा टाकला. तासभर तपासणी करण्यात आली. यामध्ये हाती काहीच लागले नाही. वडिलोपार्जित घर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईचा अहवाल भंडाऱ्याच्या पथकाला सादर केला असल्याचे आफळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)