लाचखोर पोलीस आता कायमचे घरी
By Admin | Updated: September 1, 2014 00:29 IST2014-09-01T00:26:00+5:302014-09-01T00:29:39+5:30
पोलीस अधीक्षकांचा निर्णय; गेल्या आठ महिन्यांत सात पोलीस कर्मचारी जाळ्यात; प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

लाचखोर पोलीस आता कायमचे घरी
एकनाथ पाटील - कोल्हापूर --लाच घेताना अवघ्या आठ महिन्यांत दोन पोलीस उपनिरीक्षकांसह सात पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. या लाचप्रकरणांमुळे संतप्त झालेल्या पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अशा पोलिसांना कायमचे घरी बसविण्याचा पॅटर्न प्रभावीपणे राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार त्यांनी मुख्यालय प्रशासनाकडे लाचखोरांची माहिती मागविली असून, त्यांना लवकरच बडतर्फ केले जाणार आहे.
सामान्यांच्या मते ‘हप्ता’ वसुलीचा शिक्का आजही पोलीस खात्यावर आहे. खाकी वर्दीला खूश ठेवून अवैध व्यवसायांचे जाळे पसरविणारे पंटर उथळमाथ्याने फिरताना दिसतात. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता गुन्हेगारांशी पोलिसांची सलगी असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सूत्रे हाती घेताच पोलीस ठाण्यांच्या पातळीवर जे चांगले काम करतील त्यांच्यासाठी ‘आदर्श पोलीस ठाणे’ पुरस्काराची घोषणा केली. एकंदरीत खात्याची प्रतिमा त्यांनी सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणे, प्रतिबंधक कारवाई न करणे, ‘एम केस’चा तपास फिर्यादीच्या बाजूने करणे, तक्रारदारांच्या विरोधात कायदेशीर कारवाई न करणे, मुद्देमाल परत देणे, न्यायालयाने बजावलेले समन्स कोणाकडे दिले हे सांगण्यासाठी लाच घेणारे सात पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आणि पोलीस दलाची पुरती नाचक्की झाली. या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी लाचखोर पोलिसांना कायमचे घरी (बडतर्फ) बसविण्याचा पॅटर्न प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या लाचखोरांना बडतर्फ करण्याचे आदेश निघणार असून, याबाबत वरिष्ठांनाही नोटीस पाठविण्यात येणार आहे.
लाचखोर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांना पोलीस दलामध्ये पुन्हा रुजू होण्याचा अधिकार नाही. त्यांच्या या कारनाम्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत आहे. सध्या सात लाचखोरांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. ते न्यायालयात जाऊन पुन्हा रुजू होण्याच्या मार्गावर प्रयत्न करीत असले तरी त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक
लाचखोर संशयित अधिकारी व कर्मचारी
आजरा : माधव लक्ष्मण ऊर्फ एम. एल. घोलप (पोलीस उपनिरीक्षक) गडहिंग्लज : सदानंद विठ्ठल पाटील (हेड कॉन्स्टेबल) इचलकरंजी : मेहबूब सोफेसो मुल्ला (पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर), हरिश्चंद्र बापू बुरटे (पोलीस हवालदार, शिवाजीनगर), आझाद अब्दुल रहेमान गडकरी (कॉन्स्टेबल, शहर वाहतूक शाखा) कागल : तानाजी आण्णाप्पा डवरी (पोलीस शिपाई ) करवीर : सुरेश रामचंद्र लोहार (पोलीस नाईक)