लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक
By Admin | Updated: July 2, 2016 00:15 IST2016-07-02T00:15:41+5:302016-07-02T00:15:41+5:30
पाच हजारांची लाच : सात-बारा पत्रकीच्या नोंदीसाठी मागितली होती लाच

लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक
लाच प्रकरणी मंडल अधिकाऱ्याला अटक
पाच हजारांची लाच : सात-बारा पत्रकीच्या नोंदीसाठी मागितली होती लाच
हुपरी : विरोधी पक्षाने घेतलेली हरकत नामंजूर करून लीज पेन्डन्सीचा दस्त जमिनीच्या ७/१२ पत्रकी नोंद करून घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी हुपरी (ता. हातकणंगले) येथील मंडल अधिकारी के. एस. कोळी (वय ५८, रा. तळदगे) याच्या विरोधात लाचलुचपत विभागाने शुक्रवारी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची तक्रार अमर एकनाथ शिंदे (रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांनी लाचलुचपत विभागाकडे केली होती.
याबाबतची अधिक माहिती अशी, अमर शिंदे यांची यळगूड (ता. हातकणंगले)हद्दीमध्ये शेती आहे. सध्या ही जमीन त्यांचे चुलते रामू बापू शिंदे यांच्या नावावर आहे. या जमिनीची रीतसर वाटणी झालेली नाही. या जमिनीच्या वाटणीबाबत अमर यांनी इचलकरंजी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याचा निकाल लागण्याअगोदर चुलते रामू यांनी ही जमीन परस्पर विक्री करू नये किंवा कर्ज काढू नये यासाठी अमरच्या वडिलांनी हातकणंगले दुय्यम निबंधक यांच्याकडून लीज पेन्डन्सीचा दस्त करून घेतला आहे. या दस्ताची नोंद जमिनीच्या ७/१२ पत्रकी होण्यासाठी त्यांनी यळगूड गावकामगार तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्याप्रमाणे तलाठी भिऊंगडे यांनी जमिनीच्या ७/१२ पत्रकी त्याची नोंद घेतली आहे. याबाबतची माहिती समजताच रामू शिंदे यांनी त्या नोंदीस हरकत दाखल केली आहे. त्यामुळे दस्ताची नोंद व हरकत अशा पुढील कामाबद्दल आदेश होण्यासाठी तलाठी भिऊंगडे यांनी हे प्रकरण मंडल अधिकारी के. एस. कोळी यांच्याकडे पाठवून दिले होते; परंतु कोळी यांनी या प्रकरणाबाबत निर्णय घेण्यास विलंब लावून मंजुरी देण्यासाठी अमर शिंदे यांच्याकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे अमर यांनी याबाबत १३ जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने दोन पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता मंडल अधिकारी कोळी यांनी अमर यांच्याकडे लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदशर्नानुसार उपअधीक्षक उदय आफळे, निरीक्षक प्रवीण पाटील, सहायक फौजदार खणगावकर, हवालदार श्रीधर सावंत,आदींनी ही कारवाई पार पाडली. (प्रतिनिधी)
तीन वेळा सापळा फसला
लाचलुचपत विभागाने १४, १५, व २१जूनला हुपरी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा लावला होता. त्यावेळी कोळी याना शंका आल्याने त्यांनी त्यावेळी लाच स्वीकारली नव्हती; परंतु लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने कोळी यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७ सह १३(२) अन्वये शुक्रवारी हुपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मंडल अधिकारी कोळी यांच्यावर अटकेची कारवाई केली.