रोडरोमिओंना दुसऱ्या दिवशीही ठोका
By Admin | Updated: July 18, 2015 00:58 IST2015-07-18T00:57:17+5:302015-07-18T00:58:22+5:30
युवतींना दिलासा : न्यू पॅलेस, ताराबाई पार्क परिसरातील महाविद्यालयाजवळ धरपकड सुरू

रोडरोमिओंना दुसऱ्या दिवशीही ठोका
कोल्हापूर : विनापरवाना वाहन चालविणे, महाविद्यालयाचे ओळखपत्र नसणे व महाविद्यालयाच्या आवारात टिंगलटवाळी करणाऱ्या रोडरोमिओंवर आज, शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही शाहूपुरी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. रमणमळा येथील न्यू पॅलेस परिसर, ताराबाई पार्क परिसरातील विवेकानंद महाविद्यालयाजवळ पोलिसांनी रोडरोमिओंची धरपकड सुरू केली. काही रोडरोमिआेंना ‘उठा-बशा’, तर काहीजणांकडून ‘मी या महाविद्यालय परिसरात फिरकणार नाही,’ अशी हमी घेत त्यांना सोडून दिले.
गेले दोन दिवस शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी (दि. १६) सुमारे ७७ रोडरोमिओंवर कारवाई केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत रोडरोमिंओवर कारवाई केली. त्यामध्ये न्यू पॅलेस परिसरातील एका विद्यालयाजवळ कट्ट्यावर बसलेल्या रोडरोमिओंना तसेच विनापरवाना दुचाकी वाहन घेऊन ‘घिरट्या’घालणाऱ्यांना पकडले. या सर्वांना एका झाडाखाली थांबून उठा-बशा काढण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून ‘मी या महाविद्यालय परिसरात येणार नाही’ असे हमीपत्र लिहून घेत त्यांना सोडून देण्यात आले.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलीस महावीर महाविद्यालयामार्गे ताराबाई पार्क परिसरात गेले. त्याठिकाणी विवेकानंद महाविद्यालयाच्या दोन नंबर प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी रोडरोमिओंची धरपकड सुरू केली, तर काहीजणांनी पोलीस आल्याचे पाहताच तेथून ‘धूम’ठोकली. त्यामुळे रस्त्यावर शांतता पसरली.
यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या काहींना पकडून ‘याच महाविद्यालयात आहे का?’ अशी विचारणा करत त्यांचे महाविद्यालयीन ओळखपत्र ताब्यात घेतले. तो विद्यार्थी याच महाविद्यालयातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुमारे २० ते २५ मिनिटे पोलीस या प्रवेशद्वाराजवळ थांबून होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हा प्रकार काही समजेना.
टिंगलटवाळी करणाऱ्यांवर कारवाई सुरू असल्याचे नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन पाटील, अमर आडूळकर, किरण गावडे, विशाल बंदरे, समीर माने यांच्या पथकाने केली.(प्रतिनिधी)