ब्रेक निकामी झाल्याने एसटी थेट रस्ता दुभाजकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:10+5:302021-01-13T05:03:10+5:30
चालकाचे प्रसंगावधान ; अनर्थ टळला इचलकरंजी : येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटीचे ब्रेक निकामी झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत एसटी ...

ब्रेक निकामी झाल्याने एसटी थेट रस्ता दुभाजकावर
चालकाचे प्रसंगावधान ; अनर्थ टळला
इचलकरंजी : येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ एसटीचे ब्रेक निकामी झाले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत एसटी थेट रस्ता दुभाजकावरच घातली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातात एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, इचलकरंजी आगाराची एसटी ( एमएच ९ सी ९५७०) नृसिंहवाडी येथून सकाळी निघाली. हेरवाड, अब्दुललाट मार्गे ती इचलकरंजीत आली. बांगला रोडवरून प्रांत कार्यालयात चौकात वळण घेत असताना ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याचवेळी एसटीची सायकलस्वाराला धडक लागल्याने सायकलस्वार गौरय्या अडगुल (वय ६५, रा. सांगली रोड) हे किरकोळ जखमी झाले. त्यानंतर एका दुचाकीला एसटीची धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील शेखर राजाराम बडगुजर (वय ५१, रा. नाट्यगृहाच्या मागे) हे दुचाकीसह रस्त्यावर पडले. त्यामध्ये बडगुजर यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बसस्थानकाकडे येत असताना रस्त्यावर असलेली वर्दळ, जलशुध्दीकरण केंद्रालगतच असलेली दुकाने, खाद्यपदार्थाचे गाडे, फळविक्रेते यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत जलशुध्दीकरण केंद्रासमोर असलेल्या रस्ता दुभाजकावरच एसटी घातली. एसटीची पुढील चाके दुभाजकाच्या पलीकडे जावून एसटी जाग्यावरच थांबली. घटनेनंतर चालकाने तातडीने शहर वाहतूक नियंत्रण शाखा व बसस्थानकात जावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदुकमार मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच बसस्थानकप्रमुख व अधिकारी घटनास्थळी हजर झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त एसटी बाजूला काढण्यात आली.
चौकट......
अपघातग्रस्त एसटी धावमर्यादा ओलांडलेली
एसटीची धावमर्यादा १० लाख किलोमीटर इतकी झाल्यानंतर ती स्क्रॅप ठरविली जाते. या अपघातग्रस्त एसटीने मर्यादेपेक्षा तीन लाख किलोमीटर अधिक धावली आहे. अशा खराब वाहनांमुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला नेमके जबाबदार कोण? असा सवाल घटनास्थळी उपस्थित होत होता.
दुकानगाळे व फळविक्रेते यांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा
जलशुध्दीकरण केंद्राच्या संरक्षक भिंतीलगत दुकानगाळे, फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे लावले जात आहेत. शनिवारी घडलेल्या या एसटीच्या अपघातानंतर जलशुद्धीकरण केंद्र परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले. वाहतूक सुरळीत करताना वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.