ब्रह्मपुरी व पन्हाळा हिल स्टेशन सुरक्षित आहे का?
By Admin | Updated: August 1, 2014 00:36 IST2014-07-31T23:57:58+5:302014-08-01T00:36:16+5:30
पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे

ब्रह्मपुरी व पन्हाळा हिल स्टेशन सुरक्षित आहे का?
कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर शहरातील ब्रह्मपुरी टेकडी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेल्या घरांकडे हिंदू युवा प्रतिष्ठानने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ब्रह्मपुरी व पन्हाळा येथील टेकड्यांवर होत असलेली घरे सुरक्षित आहेत का? याची पाहणी करून प्रशासनाने तसे जाहीर करावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी केले आहे.
यासंदर्भात पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, ब्रह्मपुरी टेकडीवर उत्खनन झाले आहे. सध्या उत्खनन थांबले असले, तरी टेकडीवर मोठ्या प्रमाणात वसाहत निर्माण झाली आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता ही वसाहत किती सुरक्षित आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. वसाहतीतील पाणी मोठ्या प्रमाणात झिरपून नदीत उतरताना दिसते, अशा परिस्थितीत तेथील रस्त्यावरून होणारी वाहतूक व जमिनीची प्रत पाहता टेकडीचा भाग नदीकडे झुकलेला आहे.
पन्हाळा परिसरात विश्रांती स्थळे मोठ्या प्रमाणात होत आहेत. जागा किती महाग, बंगला किती कोटींचा आहे यापेक्षा डोंगर उतारावर इमारती उभ्या केल्या आहेत. अशा इमारती उभ्या करताना जमीन कोणती आहे, त्यामधील खडक कोणता आहे, इमारतीसाठी स्ट्रक्चरल इंजिनिरिंगचे तंत्र वापरले आहे काय, याची शहनिशा होण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)